देविका घोरपडे हिची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ जुलै २०२५ - दि.३० जुलै ते १२ ऑगस्ट २२०५ दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या अंडर २२ महिला आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी ५१ किलो वजनी गटात कु.देविका सत्यजित घोरपडे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. ही निवड अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, देविकाच्या यशामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः फलटण सह सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे.
कु. देविका सत्यजित घोरपडे ही फलटणची असून, गेल्या काही वर्षांपासून ती सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तिच्या आक्रमक खेळी, चपळ हालचाली आणि मजबूत प्रतिकारशक्तीमुळे ती प्रशिक्षक आणि निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. कु.देविका घोरपडे ही फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य शिवाजीराव घोरपडे यांची नात व उद्योजक सत्यजित घोरपडे यांची कन्या आहे.
आशियाई स्पर्धेसाठीची राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा दि ७ जुलै ते १० जुलै रोजी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट,पुणे येथे पार पडली. अंतिम सामन्यात देविकाने चंदीगडच्या बॉक्सरचा पराभव केला. त्यापूर्वी तिने राजस्थान,हरियाणा व रेल्वेजच्या बॉक्सर्सना पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती व अखेर ५१ किलो वजनी गटातील देविकाची निवड निश्चित झाली.
देविकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कु.देविका घोरपडेचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यांच्यासह तिचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
No comments