श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर, फलटण येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर रविवार, दि. १३ जुलै रोजी सायंकाळी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, रविवार पेठ, फलटण येथे मुक्कामी आला होता. नेहमी आषाढ वद्य चतुर्थीस फलटण परतीच्या मुक्कामी येणारा सोहळा या वर्षी एक दिवस अगोदर आषाढ वद्य तृतीयेस फलटण मुक्कामी आला होता यावेळी शहरासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी. केली होती.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी दि. १९ जून रोजी आळंदीहून प्रस्थान केले होते. पंढरपूर येथे आषाढी एकादशी नंतर परतीच्या वाटेवर सोहळा गुरुवार, दि. १० जुलै रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाला, शुक्रवार, दि. ११ रोजी वेळापूर मुक्काम, शनिवार, दि. १२ रोजी नातेपुते मुक्काम झाला. रविवार, दि. १३ जुलै रोजी धर्मपुरी व साधुबुवा ओढा येथे सकाळचा विसावा, बरड, पिंप्रद, विडणी येथे दुपारचा विसावा आणि रात्री नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, फलटण येथे मुक्कामी आली होती. सोमवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी निंभोरे ओढा, सुरवडी, दत्त मंदिर, काळज येथे विसावा, तरडगाव येथे दुपारचा विसावा आणि लोणंद पूल फाटा येथून सोहळा रात्री पाडेगाव मुक्कामी थांबणार आहे. मंगळवार, दि. १५ जुलै रोजी वाल्हे, बुधवार, दि. १६ जुलै रोजी सासवड, गुरुवार, दि. १७ जुलै रोजी हडपसर, शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी भवानी पेठ, पुणे, शनिवार, दि. १९ जुलै रोजी पुणे, रविवार, दि. २० जुलै रोजी आळंदी आणि सोमवार, दि. २१ जुलै रोजी सोहळा संत शिरोमणी ज्ञानेश्वर मंदिर येथे मक्कामी पोहोचणार आहे.
पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असतात व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र, अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्यांची संख्या वाढली आहे. प्रवासादरम्यान नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
No comments