Breaking News

धुमाळवाडी धबधब्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; डोंगरकपारीतून पाठलाग करत पोलीसांनी केला पर्दाफाश

Gang involved in looting at Dhumalwadi waterfall arrested; Police busted them by chasing them through the mountains

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ जुलै २०२५  - फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील नयनरम्य धबधबा अलिकडील काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. दि. 08/07/2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याच्याचे सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहुन पर्यंटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असताना, वारुगडच्या टेकडीवरुन टेहाळणी करणाऱ्या एकुण 10 इसमांनी महिला पर्यटकांना हेरुन धबधब्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर गाठुन, त्यांना लाकडी दांडकी व लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार केली आहे. यामध्ये पर्यटक महिलांच्या गळ्यातील सोन्याचांदीचे दागिने व पर्यटक पुरुषाकडील मनगटी घड्याळ व पैसे असा एकुण 54500/-रु. किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. पिडीत महिला ह्या मदतीसाठी मोठमोठ्या ओरडुन आर्जव करीत असताना, सदर घटनेची माहिती धुमाळवाडी गावच्या पोलीस पाटील सौ. पल्लवी शरद पवार यांना मिळाली. त्यांनी प्रसंगावधान ओळखुन लागलीच फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांना माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

    सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे वारुगड डोंगराच्या पायथ्याला, डोंगरकपारीमध्ये असल्यामुळे त्याठिकाणी तात्काळ पोहोचणे शक्य नव्हते. परंतु पोलीसांनी घटनेचे गांर्भीय ओळखून आपला अनुभव व कसब पणाला लावुन केवळ पिडित महिलांनी संशयितांबाबत सांगितलेल्या तुटपुंज्या वर्णनावरुन सुमारे 10 कि. मी. ओढ्यानाल्यातून, दगडधोंड्यातून व डोंगरदरीतून अंधारामध्ये सुमारे 06 तास पाठलाग करुन तीन संशयित इसमांना पकडले असुन त्यांची नावे 1. दिपक नामदेव मसुगडे, वय 30 वर्ष, रा. नवलेवाडी, मलवडी, ता. माण, जि. सातारा 2. विलास उर्फ बाबु दत्तात्रय गुजले वय 21 वर्ष, रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे 3. चेतन शंकर लांडगे वय 25 वर्ष, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा अशी आहेत. सदर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्हा करताना वापरलेला चाकु व बजाज पल्सर मोटार सायकल काढुन दिल्यामुळे ती जप्त करण्यात आली आहेत.

    सदर गुन्ह्यामध्ये वरील अटक आरोपींव्यतिरिक्त 1. रणजित कैलास भंडलकर 2. तानाजी नाथाबा लोखंडे दोघे रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा 3. अक्षय महादेव चव्हाण, रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे 4. वैभव सतिश जाधव, 5. रामा शंकर जाधव 6. सुरज कैलास जाधव, रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झाला आहे. सदरचे संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारमारी व विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वात दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलीस अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, हणमंत दडस, तुषार नलवडे, कल्पेश काशिद, नितीन धुमाल, निलेश कुदळे, अक्षय खाडे यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये धुमाळवाडी गावचे नागरिक शरद पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीसांशी सुसवांद साधुन घटनेची अचुक माहिती दिली होती.

    सदर घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 510/2025, भा. न्या. सं. 2023 चे कलम 310(2) अन्वये गुन्हा नोंद असुन त्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत.

No comments