Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चा शुभारंभ ; मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत समारोप

Inauguration of 'Baramati Power Marathon' by Deputy Chief Minister Ajit Pawar; Concluded in the presence of Minister Sanjay Bansode

    बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ मधील मॅरेथॉन स्पर्धेला विद्या प्रतिष्ठानच्या बायोटेक्नोलॉजी मैदान येथे हिरवी झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

    यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, स्पर्धेचे आयोजक आयर्नमॅन सतीश ननवरे आदी उपस्थित होते. ४२ कि.मी ची मॅरेथॉन, २१ कि.मी. ची अर्धमॅरेथॉन आणि १० कि. मी. दौड अशा तीन प्रकारात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय ५ कि. मी. फन दौडचे सुद्धा आयोजन करण्यात आले.श्री. बनसोडे यांच्या हस्ते १० कि. मी. आणि ५ कि. मी. दौड स्पर्धेला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

    श्री. बनसोडे यांच्या हस्ते विजेत्या धावपटुला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, खेळाडूंच्या सोईसाठी हरियाणा, पंजाब, ओडीसा राज्यातील ऑलिम्पिक भवनच्या धर्तीवर राज्यातही ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी ७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच पुण्यामध्ये त्याचे भूमीपूजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

    मागील चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये विविध निर्णय खेळाडूंना समोर ठेवून आपण घेतले आहेत. कोविडच्या काळापासून रखडलेले मागील तीन वर्षाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. क्रीडा पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

    चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला १० लाखावरुन १ कोटी रुपये, रौप्य पदक ७५ लाख आणि कास्य पदक विजेत्या खेळाडूला ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सहभागी खेळाडूला जाण्या-येण्याकरीता १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा सुविधांचा विकासासाठी क्रीडा संकुल बांधकामासाठीही भरीव निधी देण्यात येत आहे.

    बारामती परिसरात कृषी, उद्योग, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उत्तम काम होत असून त्याला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सुरू असलेल्या नवीन इमारती करिता १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’करीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. या स्पर्धेचे बारामती सोबत राज्यातही आयोजन करण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. बनसोडे म्हणाले

    यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि स्पर्धेचे आयोजक आयर्नमॅन सतीश ननवरे यांनीही विचार व्यक्त केले.

No comments