फलटण शहरात डेंग्यू रुग्ण वाढले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑगस्ट - शहरात डेंग्यूसदृश साथ पसरली असून, लक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, रविवार पेठ, मलठण या परिसरात डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. फलटण नगर परिषदेने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. डास उत्पत्ती होण्याचा संभव असणाऱ्या ठिकाणांचा बंदोबस्त नगरपालिका व आरोग्य विभागाकडून होणे गरजेचे आहे.
शहरात मंगळवार पेठ, रविवार पेठ, मलठण, लक्ष्मीनगर, रायगड हॉटेल जवळ, या ठिकाणी पाणी साठून, कचरा साठून त्यावर डास घोंगावताना दिसत आहेत, त्यामुळे याभागातील डेंग्यूरुग्णामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे, शहरात डेंग्यू सदृश्य रोग पसरू लागला आहे, हॉस्पिटलमध्ये रुग्ण डेंग्यू किंवा डेंग्यूसदृश्य साथीवर उपचार घेत आहेत.
फलटण शहरात सुरू असलेल्या इमारत कन्स्ट्रक्शनच्या ग्राउंड फ्लोअर अथवा तळघरात पाणी साठून राहत आहे. तसेच सखल भागातही पाणी साठून दलदल झाली आहे. या साठलेल्या पाण्यावर होणाऱ्या डास उत्पत्तीकडे नगर पालिका व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या साठलेल्या पाण्यात गप्पी मासे किंवा ऑइल पसरवणे गरजेचे आहे, त्याच बरोबर इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून डासांची उत्पत्ती आटोक्यात येईल.

No comments