Breaking News

बाणगंगा धरण परिसरात वीज चोरी प्रकरण; पत्रकारांच्या स्टिंग ऑपरेशननंतर महावितरणची कारवाई

Electricity Theft Case in Banganga Dam Area; Mahavitaran Takes Action Following Journalists' Sting Operation

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १७ : बाणगंगा धरण परिसरातील वाखरी गावाच्या हद्दीत आकडा टाकून सुरू असलेल्या वीज चोरीचा प्रकार पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघडकीस आला असून, महावितरणने तत्काळ कारवाई करत शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीवर पंचनामा केला आहे. या प्रकरणात कंपनीचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीकडून तब्बल सहा महिन्यांपासून अनधिकृतरीत्या वीज वापर केला जात होता. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार समोर आणला. यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून दरमहा हप्ता घेतला जात असल्याचीही चर्चा पुढे आली.

    स्टिंग ऑपरेशनमधील माहितीच्या आधारे महावितरणच्या वाठार निंबाळकर येथील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान एलटी लाईनवरून थेट वीज चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. कारवाईदरम्यान सुमारे ४० फूट वायर जप्त करण्यात आली. तसेच ट्यूब, फॅन, कुलर, बल्ब आदी उपकरणांचा पंचनामा करण्यात आला.

    प्राथमिक तपासात सुमारे एक किलोवॅट वीज वापर होत असल्याचे आढळून आले असून, त्यानुसार ७३०० रुपयांचे वीज बिल व दंड आकारण्यात आला आहे. संबंधित रक्कम २४ तासांच्या आत न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

No comments