Breaking News

धनगर समाजाच्या पोरांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी धनगर जागर महामेळाव्याचे आयोजन - पांडुरंग वाघमोडे पाटील


Organization of Dhangar Jagar Mahamelava to give a political platform to the boys of Dhangar community

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र मध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यामध्ये धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे मात्र संख्येच्या तुलनेमध्ये समाजातील तरुणांना राजकारणामध्ये स्थान  मिळताना दिसत नाही यासाठी धनगर समाजाला राजकीय दृष्ट्या जागृत करून समाजातील पोरांना राजकीय व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी या धनगर जागर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन माळशिरस तालुक्याचे युवा नेते पांडुरंग वाघमोडे यांनी केले आहे.

    धुळदेव तालुका फलटण येथे  आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य धनगर जागर महामेळाव्यात वाघमोडे बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री अण्णासाहेब डांगे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार ऍडव्होकेट रामहरी रुपनवर श्री. श्री. रविशंकर  साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनववकर, फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बजरंग गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बजरंग खटके आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, श्री धुळदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय भिवरकर, सचिव मारुतराव भिवरकर, ग्रामपंचायतचे सरपंच व्यंकटराव दडस इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पुढे पांडुरंग वाघमोडे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष हे धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देताना दिसत नाही समाजातील पोरांना राजकारणामध्ये पदे व महत्वाची जबाबदारी दिली जात नाही. असे सांगून पांडुरंग वाघमोडे म्हणतात की, धनगर समाजाचा फक्त राजकीय निवडणुकीपुरता व मतासाठी वापर केला जात आहे परंतु सर्व पक्षांनी हे ही लक्षात ठेवावे की ही जात प्रामाणिक आहे.  भविष्यात या जातीला राजकारणामध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले नाही तर हा समाज गप्प बसणार नाही. तो निश्चितच आपला राजकीय प्रवासाकडे जाणारी वाटचाल शोधेल  असेही पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी शेवटी सांगितले.

    यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, ॲड. रामहरी रुपनवर, भाजप प्रवक्ते गणेश हाके, बजरंग खटके, माणिकराव सोनवलकर यांची समायोजित भाषणे झाली.

    कार्यक्रमात धनगर समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांचा "श्रीमंती धनगराची" हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

    आभार दादासाहेब चोरमले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भिवरकर यांनी केले.


No comments