प्रत्येकाने व्यायाम किंवा कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे - श्रीमंत संजीवराजे ; उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा फलटण येथे शुभारंभ
![]() |
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व्यासपिठावर शिवाजीराव घोरपडे, महादेव माने, प्राचार्य बी.एम. गंगवणे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - अलीकडच्या काळात बदललेल्या जीवनशैलीत खेळणे महत्वाचे झाले आहे, आपल्या व्यस्त कामकाजात आपल्याला व्यायामाला विशेष असा वेळ मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम किंवा कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करतानाच खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य, सराव, कष्ट या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीच्यावतीने आयोजित १५ दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य महादेव माने, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी.एम. गंगवणे, पर्यवेक्षक व्ही.जी. शिंदे व एस. एम. काळे उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की आपण सर्व उन्हाळी शिबिरात १५ दिवस प्रशिक्षण व मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहात त्याबद्दल आपले स्वागत, कारण अलीकडे खेळ हा महत्त्वाचा विषय झाला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाला वाव मिळत नाही, तथापि आपण वेळ काढून खेळ व व्यायाम केले पाहिजेत. आजच्या धावपळ व धकाधकीच्या जीवनात त्याची आवश्यकता आहे. खेळामधून करिअर घडवले जाऊ शकते, त्याद्वारे खेळाडूंना अनेक ठिकाणी प्राधान्य दिले जाते. फलटणमध्ये अनेक खेळ लोकप्रिय आहेत व ते खेळले जातात. त्यामुळेच अनेक गुणवान खेळाडू या भूमीत तयार झाले आहेत. आजही तयार होत आहेत. ऑलम्पिकमध्ये खेळून आलेला प्रवीण जाधव तसेच हॉकीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फलटणच्या अनेक मुली नावलौकिक मिळवित आहेत. त्यामध्ये अक्षदा ढेकळे आज हॉकीमध्ये भारताच्या टीमचे नेतृत्व करत आहे. फलटणला खो-खो ची मोठी परंपरा आहे. राष्ट्रीय खेळाडू येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून फलटणचे नाव उंचावत आहेत. फलटणला विविध खेळाची मोठी परंपरा आहे, ही परंपरा अशीच पुढे नेण्याची अवश्यकता आहे ते तुम्ही पुढे बसलेले खेळाडू पुढे घेऊन जाऊ शकता.
यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांनी या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा व हे प्रशिक्षण शिविर संपल्यानंतर संबंधित खेळाचा दररोज सराव करावा असे आवाहन करून प्रशिक्षण शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी स्वागत केल्यानंतर सचिन घुमाळ यांनी प्रास्ताविकात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर २५ एप्रिलपर्यंत होणार असून हॉकी, फुटबॉल, खो-खो हे खेळ श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान) येथे, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती व कबड्डी हे खेळ मुधोजी महाविद्यालय क्रीडांगणावर होणार आहेत. बास्केटबॉल मुधोजी क्लबच्या मैदानावर आणि आर्थरी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी या क्रीडांगणावर होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना रोज सकस व पौष्टिक अल्पोपहार दिला जाईल. सर्व विद्यार्थ्यांना खेळाडूंचा खुराक कसा असावा, खेळातील दुखापतीवर काय उपचार मार्गदर्शन घ्यावेत याबाबत मार्गदर्शन होणार आहे. शिबिरार्थी तज्ञ क्रीडा मार्गदर्शक खेळातील विविध कौशल्ये शिकविणार आहेत. या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये ५५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
No comments