Breaking News

फलटण एस. टी. बस स्थानकावर चिखलाचे साम्राज्य : प्रवाशांचे हाल

Mud at Phaltan ST bus stand

 फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) फलटण बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठून, चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने, प्रवाशांना त्यातून वाट काढून, एस. टी. बस मध्ये प्रवेश करावा लागत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. 

    फलटण बस स्थानक दुरुस्ती व बस स्थानकातील खुल्या जागेचे सिमेंट काँक्रिटीकरण गेल्या २ वर्षांपासून धीम्यागतीने सुरु आहे. वास्तविक संपकाळात बसेस बंद असताना सदर काम पूर्ण करुन घेता आले असते, त्यावेळी ते केले गेले नाही, आता पावसाळा सुरु झाला आहे, शाळा महाविद्यालये सुरु होत आहेत, विद्यार्थी शहरात येत आहेत, शेतीचे हंगाम असल्याने शेतकरी बी - बियाणे, खते, औजारे खरेदीसाठी येत आहेत, विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश, वह्या, पुस्तके, शालेय गणवेश खरेदीसाठी पालक तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत, पावसाळी वातावरणामुळे वृद्धांच्या प्रकृतीमध्ये होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ते  एस. टी. बसचा आधार घेत तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याने बस स्थानकावर सर्व वयोगटातील आणि विविध समाज घटकातील प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

     बस स्थानकावर सिमेंट काँक्रीटी- करण काम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली असून बस मध्ये चढ उतार करताना विशेषत: महिला, वृध्द, लहान मुले यांची मोठी कुचंबना होत असून चिखल व पाण्यात पडल्याने त्यांना दुखापत होण्याचा धोका असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

    एस. टी. बसेसची दुरावस्था झाली असूनही लांब पल्ल्याच्या बसेस अधिक सोडून केवळ किलो मीटर वाढविण्याला प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिक प्रवाशांना वेळेवर बसेस उपलब्ध होत नाहीत तर लांब पल्ल्याच्या बसेस फलटण पासून २०/२५ कि. मी. वर बंद पडल्याने त्यांच्या दुरुस्ती देखभालीसाठी किंवा त्या टोचन करुन आगारात परत आणण्यासाठी बस उपलब्ध करुन देताना आगार प्रमुख व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.

   एस. टी. बस आगार असूनही बसेस पुरेशा नाहीत, आहेत त्या जवळपास नादुरुस्त आहेत. कोरोना काळात खाजगी प्रवासी वाहतुकीचे कंबरडे मोडल्याने प्रवाशांना उपलब्ध असलेला पर्याय आता उरला नसल्याने एस. टी. बस हा एकच आधार असून फलटण शहर व तालुक्यातील प्रवाशांना त्याचा उपयोग होत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.

No comments