सांगवीत आदर्श विकासकामे केल्याने सनी मोरेंच्या पत्नी मनिषाताईंना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याची जनतेची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ - नीरा नदीच्या काठावर वसलेले सांगवी (ता. फलटण) हे गाव सरपंच संतोष उर्फ सनी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श विकासाचे उदाहरण ठरत आहे. गावात झालेल्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासकामांमुळे विडणी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या पत्नी सौ. मनिषाताई मोरे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी संपूर्ण गटातील मतदारांकडून होत आहे.
सांगवी गावाच्या विकासासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित पद्धतीने विकासकामे करण्यात आली.
जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तसेच अंतर्गत रस्ते, गटारी, स्वच्छता व्यवस्था, दिवाबत्ती, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे.
ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका नियमितपणे घेणे, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर प्रभावी देखरेख ठेवणे, दस्तऐवज सुरक्षित ठेवणे, जन्म-मृत्यू व विवाह नोंदी वेळेत पूर्ण करणे, कर वसुली करून त्यातून विकासकामे राबवणे, तसेच शासकीय योजनांचा सातत्याने पाठपुरावा करणे या सर्व बाबींमध्ये सरपंच सनी मोरे यांनी आदर्श निर्माण केला आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचवून हजारो नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनतेच्या समस्या थेट सोडवण्याची तत्परता आणि शासकीय कामकाजात सक्रिय सहभाग यामुळे सनी मोरे यांना गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, सांगवीसह संपूर्ण विडणी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सौ. मनिषाताई संतोष उर्फ सनी मोरे यांना जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी द्यावी, अशी ठाम आणि वाढती मागणी जनतेतून पुढे येत आहे.

No comments