Breaking News

बा.सींच्या जयंतीला कवी महोत्सव घ्या - प्रा. मिलिंद जोशी ; बा. सी. मर्ढेकरांच्या निवासस्थान नुतनीकरणाचा प्रारंभ

Commencement of renovation of Mardhekar's residence

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा)  - बा. सी. मर्ढेकरांनी मराठी कविता अमूलाग्र बदलून टाकली. मराठी कवितेच्या आधुनिकतेचा झेंडा फडकवण्याचे काम मर्ढेकरांनी केले. मर्ढेकर हे आधुनिक कवितेचे काव्यतीर्थ आहे. दरवर्षी मर्ढेकरांच्या जयंतीला कवी महोत्सव घ्यावा. महाराष्ट्रातील सर्व कवी येथे आणण्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेची राहिल, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. दरम्यान, मर्ढेकरांच्या घरांच्या पुनरूज्जीवनाचे काम हाती घेवून, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपूरी शाखेने, परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

    मराठीचे नवकवी बा. सी. मर्ढेकर यांच्या जयंतीदिनानिमित्त मर्ढे, ता. सातारा येथील  त्यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणाचा प्रारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, 'मसाप'चे शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, बा. सी. मर्ढेकर समितीचे सदस्य, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याणनिधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, बापूराव शिंगटे, सरपंच शरद शिंगटे, उपसरपंच अमोल शिंगटे, शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, संजय माने  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बा. सी. मर्ढेकर यांच्या निवासस्थानच्या नुतनीकरणाच्या प्रारंभ प्रसंगी प्रा. मिलिंद जोशी, मिनाज मुल्ला, विनोद कुलकर्णी, हरीष पाटणे, रवींद्र बेडकीहाळ, शरद शिंगटे आदी.

    प्रा. जोशी म्हणाले, बा. सी. मर्ढेकरांनी आयुष्यात फार संघर्ष केला. आज कोणाला टोचू नये, बोचू नये अशी कविता लिहिली जाते. परंतु, टोचणारी कविता लिहिणे हे कवीचे काम आहे. सत्याचा स्पर्श त्या कवितेला पाहिजे. सत्य परखडपणे सांगणारे कवी कमी झाले आहेत. मर्ढेकरांनी हे त्या काळात सांगितले म्हणून मर्ढेकरांचे नाव घेतो. आताच्या कवितांमध्ये परखडपणा दिसत नाही. सगळीकडे सर्वांना खुश करणारी कविता लिहिली जाते. पण मर्ढेकरांनी ते पथ्य आयुष्यभर पाळले. त्यामुळे त्यांना मोठ्या वादविवादालाही सामोरे जावे लागले. हे वादविवाद झेलूनही मर्ढेकरांची कविता टिकून आहे, ही महत्वाची गोष्ट आहे.

    एकीकडे प्रेम कविता, दुसरीकडे प्रासंगिक कविता आणि तिसरीकडे क्रांतीकारक कविता अशा पध्दतीने कवितेची वाटचाल सुरू होती. अशा परिस्थितीत मर्ढेकर नावाच वळण मराठी कवितेत आले आणि त्यांनी मराठी कविता अमूलाग्र बदलून टाकली. सगळीकडे यंत्रयुग सुरू झालं होते. यंत्रयुगात सगळी माणसे तुटायला लागली होती. यामधील भावनिक, सामाजिक व संवेदनशील पातळीवरील घुसमट मर्ढेकरांनी पहिली मांडली. मराठी कवितेला एक वैश्विक स्वरूप दिले. केशवसुत हे मराठी कवितेचे आद्य प्रवर्तक असले तरी मराठीच्या आधुनिकतेचा झेंडा फडकवण्याचे काम मर्ढेकरांनी केले. दरवर्षी मर्ढेकरांच्या जयंतीला कवी महोत्सव घ्यावा. महाराष्ट्रातील सर्व कवी येथे आणण्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेची राहिल, असेही प्रा. जोशी म्हणाले.

    मिनाज मुल्ला म्हणाले, 'मसाप'च्या शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मर्ढेकर यांच्या घराचा उध्दार करत आहोत हे महत्वाचे आहे. स्मारक उभारणी व फलक लावण्याचे काम आपण करत आहोत. त्यातूनच कवी निर्माण होणार आहेत. गावाच्या भिंती रंगवणे व कविता लिहिणे ठरवण्यात आले होते. परंतु तेव्हापासूनच कोरोना संकट आले. कवींचे जगणे समोर आले पाहिजे, यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची आहे.

    हरीष पाटणे म्हणाले, बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक अत्यंत कष्टाने उभे केले आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. मर्ढेकरांच्या निवासस्थानाचे पुनरूज्जीवन 'मसाप'ची शाहूपुरी शाखा, प्रशासन व ग्रामस्थांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्ढेकरांच्या जयंतीदिनी काव्य महोत्सव घेण्याचा संकल्प घेण्यात आला आहे.

    विनोद कुलकर्णी म्हणाले, बा. सी. मर्ढेकरांच्या जयंतीदिनीच त्यांच्या घराचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने घेतला आहे. ज्यावेळी कवी व पर्यटक मर्ढे गावात येतील त्यावेळी ते विचारतील की मर्ढेकरांचे घर कोठे होते ते आपल्याला दाखवता आले पाहिजे. ती वास्तू पडझडीच्या स्वरूपात असता कामा नये. त्या वास्तूत गेल्यानंतर साहित्याची दरवळ पर्यटकांना आली पाहिजे, या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे. काव्य महोत्सव आयोजित करण्यासाठी शाहूपुरी शाखा पुढाकार घेईल. शिंगटे यांनी काव्य महोत्सवासाठीही नियोजन करावे. नुतनीकरणाचे काम ३ ते ४ महिन्यात होईल. त्यानंतर लोकार्पण करू. हिराबाई निकम यांच्याच हातात ही वास्तू देणार असून, त्यांना आवश्यक ते सहकार्य शाहूपरी शाखा करेल.

    रवींद्र बेडकीहाळ म्हणाले, बा. सी. मर्ढेकरांच्या निवासस्थानीचे नूतनीकरण होत आहे, हे अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे या वास्तूतील दालनात विविध वास्तू दिल्या जातील.

    अजित जाधव यांनी मर्ढेकरांचा इतिहास सांगितला. कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंगटे, सदस्य विक्रम शिंगटे, समिती सदस्य मानसिंगराव शिंगटे, महादेव शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत शिंगटे, प्रदीप चव्हाण, मंडलाधिकारी कुलकर्णी, तलाठी सावंत, ग्रामसेवक नेवसे, ग्रामपंचायत क्लार्क अंकुश कदम यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थितीत होती.

No comments