Breaking News

हात धुवा आणि आजार दूर ठेवा

Wash hands and keep away from illness

    आज 'जागतिक हात धुवा दिन' आहे. हातांची स्वच्छता रोज राखल्यास अनेक प्रकारचे आजार दूर ठेवणे शक्य होते. त्यासंदर्भात लोकजागृती व्हावी, यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. कोरोना साथीच्या काळात हॅन्डवॉश, साबण आणि पाण्याने हात धुण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आले आहे. हात धुणे ही सर्वांनाच वाटणारी किरकोळ गोष्ट पण जागतिक पातळीवर फार महत्त्वाची मानली गेली आहे.

     प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूला दरवेळी आपला हस्तस्पर्श होतच असतो. त्या त्या प्रत्येक वेळी आपल्या हातांना धूळ, गंज, विशिष्ट, दूषित पदार्थाचे कण चिकटून अनेक जंतू व विषाणूंचा प्रादुर्भाव होत असतो. तो सूक्ष्मदर्शकाखाली जास्त दिसून येतो. एरव्ही आपण म्हणतच असतो की 'हे काय माझे हात अगदी स्वच्छ आहेत' पण ते साबणाने किंवा हॅन्डवॉशने धुतल्याखेरीज स्वच्छ होत नाहीत. नुसते हात धुण्यापेक्षा साबणाने हात धुतल्यास हातावरील जंतू व मलाचे अंश नाहीसे करण्यास ते जास्त परिणामकारक ठरू शकते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.

    उलट्या, जुलाब, न्युमोनिया तसेच त्वचा व डोळ्यांचा जंतूसंसर्ग टाळण्यासाठी हात साबणाने धुणेच आवश्यक आहे. शौचास जाऊन आल्यावर फक्त ५३ टक्के लोक हात धुतात आणि जेवण्याअगोदर फक्त ३८ टक्के लोक हात घुतात. शिवाय जेवण बनविण्याअगोदर ३० टक्के लोक हात धुतात. साबणाने हात धुण्याच्या साध्या क्रियेने ५० टक्के मृत्यू टळू शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. साबणाने हात धुण्याचे महत्त्व लक्षात घेऊन युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने '१५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुण्याचा दिवस म्हणून जाहीर केला आहे.

    शौचालयाचा नियमित वापर, सर्व महत्त्वाच्या वेळी साबण, हॅन्डवॉश आणि पाण्याने हात धुणे, पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा वापर अशा स्वच्छता सवयींचा सर्वांनी स्वीकार केला, की सामान्य आजारांसह कोरोना सारख्या संसर्गजन्य रोग देखील आटोक्यात येतील. 

No comments