हनी ट्रॅप : 2 लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 26 मे 2021 - फलटण येथील पीडित व्यक्तीस, गोळी, भुस्सा विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेने, पीडित व्यक्तीचा मोबाईल नंबर घेऊन त्याच्याशी ओळख वाढवली व नंतर लॉजवर नेऊन, महिला व तिच्या साथीदारांनी, बलात्काराची केस टाकू अशी धमकी देऊन, व्यापाऱ्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वाजण्याच्या सुमारास, महीला आरोपी हिने गोळी, भुस्सा घेण्या करीता १० हजार अॅडव्हान्स देणेचा आहे. व मला तुमच्याशी बोलायचे आहे असा बहाणा केला. व पीडित व्यक्तीचा मोबाईल नंबर घेतला. नंतर पीडित व्यक्तीस वारंवार फोन करून, मुद्दाम लगट करून, फलटण येथील एका लॉज वर नेले व रूमचा दरवाजा महिलेने लावला. नंतर महिलेने बाथरूम मध्ये जावून कोणाला तरी फोन केला, काही वेळाने रूमचा दरवाजा जोरजोरात वाजल्याने पीडित व्यक्तीने दरवाजा उघडला असता. राजू बोके व त्यांचे चार साथीदार तेथे आले व त्यांनी पीडित व्यक्तीस लॉजचे जिन्याने खाली खेचत, मारहाण करीत, खाली आणले व जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत बसवले. गाडी आरोपी चालवित होता व त्याचे शेजारील शिटवर पीडित व्यक्ती यांना बसविले होते व इतर इसम, महिलेसह त्याच गाडीत बसले. आरोपी गाडीत देखिल पीडित व्यक्तीस मारहाण करून, तुझ्या विरुद्ध बलात्काराची तक्रार देतो असे म्हणाले. नंतर आरोपी किसान अॅग्रो कंपनी समोर गाडी घेवून गेले व तेथे पीडित व्यक्तीस सर्वांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण, दमदाटी करून ५ लाख रुपयांची मागणी केली. पीडित व्यक्ती यांचे मित्र सदर ठिकाणी आले व सदर बाब मिटवून घ्या असे म्हणून २ लाख रुपये दिले असल्याची फिर्याद पीडित व्यक्तीने दिली असून त्या अनुषंगाने राजू बोके इतर चार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहे.
यापूर्वी पोलीसांनी फिर्यादी यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल या अटी वर तक्रार दयावी असे मिडीया मधून केलेल्या आवाहनास फिर्यादी हे समक्ष पोलीस ठाण्यात येवून घडल्या प्रकाराबाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपार पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, श्री. एन. आर. गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.एस.ए.बनकर पोलीस उपनिरीक्षक, एस.एन. भोईटे सहाय्यक फौजदार, व्ही. पी. ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल, एस.डी. सुळ पोलीस नाईक, एस. ए. तांबे पोना, एन. डी. चतुरे पोलीस नाईक १९, व्ही. एच. लावंड पोलीस नाईक,ए. एस.जगताप पोलीस शिपाई यांनी केलेली आहे.
तरी फलटण शहर पोलीस ठाणेचे वतीने पुन्हा एकदा जाहीर आवाहन करण्यात येते की, जर अशा प्रकारची घटना कोणा बरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.
No comments