फलटण येथे मोफत म्युकरमायकोसीस रोगनिदान शिबीर
Free Mucormycosis Diagnosis Camp at Phaltan
फलटण (प्रतिनिधी) - फलटण डॉक्टर्स असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन बारामती / फलटण शाखा यांच्या संयुक्त सहभागाने बुधवार दि. २६ मे २०२१ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत, अनंत मंगल कार्यालय, कोळकी फलटण येथे मोफत म्युकरमायकोसीस रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, फलटण शहर व तालुक्यातील रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आपण सगळेच कोरोना महामारीच्या जीवघेण्या संकटाला धैर्याने तोंड देत आहोत, ICMR च्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन नुकतेच या महामारीचा सामना करतो ना करतो तोच, कोरोना आजारात वापरण्यात आलेली स्टिरॉइड्स, अनियंत्रित असणारा मधुमेह यामुळे रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी होऊन त्यांना कोरोना पश्चात म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे, हा बुरशीजन्य आजार अतिशय घातक असून यामध्ये सुमारे ४० ते ८० टक्के मृत्युदर आहे, काही रुग्णांची दृष्टी कायमची जात आहे, तर काही रुग्णांचे नाक व जबड्याचे हाड काढून टाकावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर मोफत रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
या रोगाच्या काही प्राथमिक लक्षणांमध्ये दात दुखणे, दात हालणे, हिरड्यांना सूज व पू येणे, तोंडाचा घाण वास येणे, चेहऱ्यावर, जबड्यावर सूज येणे, नाकातून काळा किंवा लालसर द्रव येणे, नाक चोंदणे, डोळ्याच्या भोवती व टाळूवर काळे चट्टे पडणे, ताप येणे, डोळे लाल होणे, एकच वस्तू दोनदा दिसणे, डोकेदुखी वगैरेंचा समावेश असल्याचे संयोजकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कोरोना प्रमाणेच याही आजारावर, लवकर निदान आणि लवकर योग्य उपचार हाच एकमेव पर्याय उपयोगी ठरत आहे, वेळीच निदान केले तर आपण या आजाराला नक्कीच प्रतिबंध घालू शकतो याची ग्वाही देत त्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.
फलटण पंचक्रोशीतील ज्या लोकांना, दि. १ एप्रिल नंतर कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांना वरील प्रकारची कोणतीही लक्षणे आहेत, तसेच ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे अशा सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ज्या रुग्णांना या शिबीराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरुन मंगळवार दि. २५ मे २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments