अपघातातील वाहनाचा धक्का लागल्याने दुधेबावीच्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

दुधेबावी (गंधवार्ता वृत्तसेवा) 13 ऑक्टोबर 2020 - पुणे - मुंबई महामार्गावर पनवेल येथे गस्त घालत असणारे पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांचा महामार्गावर दोन वाहनांची धडक होवून झालेल्या अपघातामध्ये वाहनाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे.
पोलीस कर्मचारी सचिन नागदास सोनवलकर (वय ३५) हे मूळचे दुधेबावी ता. फलटण येथील असून ते सध्या पनवेल येथे कार्यरत होते. सचिन सोनवलकर यांच्या पश्चात आई वडील पत्नी १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील असलेले सचिन सोनवलकर हे ८/१० वर्षापूर्वी मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. सचिन सोनवलकर हे शांत व संयमी त्याचबरोबर हुशार होते. सचिन सोनवलकर यांचे शालेय शिक्षण दुधेबावी ता. फलटण येथे तर ८ ते १० वी पर्यतचे शिक्षण जयभवानी हायस्कूल तिरकवाडी येथे झाले आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व मुधोजी महाविद्यालय फलटण येथे बी. ए पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले होते. सचिन सोनवलकर यांनी पोलीस दलात ८/१० वर्षे काम केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व मित्र मंडळी आणि दुधेबावी ग्रामस्थ यांचेकडून समजलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सचिन सोनवलकर हे मुबंई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते. सोमवारी रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास पनवेल येथील हद्दीत पुणे बाजूला जाणाऱ्या मालवाहू (MH-04-4563) ट्रकला मागून आलेल्या एका ट्रेलरने (NL-01-L-6497)धडक दिल्याने तिथे गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना अपघातातील वाहनाचा जोरदार धक्का लागला.
वाहनांचा वेग जास्त असल्याने सचिन सोनवलकर यांना जोरात मार लागला त्यामुळे सचिन सोनवलकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पनवेल पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभाग पनवेल येथील सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठाणे वाहतूक विभाग अधिक्षक दिगंबर प्रधान यांनी घटनास्थळी भेट दिली.
सचिन सोनवलकर यांचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत अधिक तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस करीत आहेत.
दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना आपला जीव गमवावा लागल्याने पोलीस दलावर व दुधेबावी गावावर शोककळा पसरली आहे.
No comments