गुणवरे ता. फलटण येथे दि. ८ ऑक्टोबर पर्यन्त जनता कर्फ्यु

फलटण : गुणवरे, ता. फलटण येथील विविध व्यावसाईक, व्यापारी व ग्रामस्थांनी कोरोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणून कोरोनाला गावाच्या एकजुटीने गावातून हद्दपार करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी दि. २ ते दि. ८ ऑक्टोबर दरम्यान वाडीवस्तीसह संपूर्ण गुणवरे गावात जनता कर्फ्युचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे.
शुक्रवार दि. २ ऑक्टोबर ते गुरुवार दि. ८ ऑक्टोबर दरम्यान गुणवरे गावासह वाडी वस्तीवरील सर्व दुकाने पूर्ण पणे बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे, तथापी गुणवरे गावातील दवाखाने, औषध दुकाने बंद मधून वगळण्यात येणार असून गावातील कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत उघडी राहणार आहेत. मंगळवार व शनिवार बाजार, भाजीपाला विक्री बंद राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
गुणवरे गाव व वाडी वस्तीवरील कोणाही दुकानदाराने बंद कालावधीत ग्राहकाला माल देण्याचा प्रयत्न केल्यास २ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे, तसेच मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. बाहेर गावातील कोणी व्यापाऱ्याने येथे आपल्या मालाची विक्री केल्यास त्यांनाही २ हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल त्यामुळे बंदच्या कालावधीत बाहेर गावच्या कोणाही व्यापाऱ्याने गावात व्यापाराच्या उद्देशाने येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीतील गुणवरे बंद गाव व वाडीवस्तीवरील व्यापाऱ्यांप्रमाणे ग्रामस्थानीही विशेष खबरदारी घ्यावी, शक्यतो घराबाहेर पडू नये, आवश्यक असेल तर सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा वापर करावा, काम होताच लगेच घरात थांबावे, शक्यतो बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थ व गुणवरे गाव आणि वाडी वस्तीवरील दुकानदार यांच्या उपस्थितीत सर्व संमतीने, एक विचाराने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments