अमीर शेख यांचा युटर्न; राजे गटातून पुन्हा भाजपात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ – फलटणच्या स्थानिक राजकारणात काल उशिरा रात्री नाट्यमय घडामोड घडली. माजी खासदार गटाकडून उमेदवारीस इच्छुक असणारे सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांचा दि. १६ रोजी रात्री विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटात प्रवेश झाला होता. या प्रवेशावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, महेंद्र सूर्यवंशी (बेडके), विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मात्र काही तासांतच परिस्थितीत अचानक बदल झाला. उशिरा रात्री अमीर शेख यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची घोषणा केली. त्यांनी आपण खासदार गटासोबत असल्याचे स्पष्ट केले.
या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अनुप शहा, रणजितसिंह भोसले, बबलू मोमीन आदी उपस्थित होते.
अमीर शेख यांच्या या 'युटर्न'मुळे फलटणच्या राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

No comments