म्हसवड उपकेंद्रातील 3 कृषीपंप वाहिन्या सौरऊर्जेवर
![]() |
म्हसवड सौर प्रकल्पाचे फोटो |
सातारा, दि. 4 ऑक्टोबर, 2020 – ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून म्हस्वड (ता. माण) येथे साकारलेल्या साडेसहा मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून 12 गावांतील 1800 शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीचे निमित्त साधून ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील 50 कृषीवाहिन्या सौर ऊर्जेवर सुरु करण्याचे निर्देश दिले होते. या 50 मध्ये महावितरणच्या बारामती परिमंडलातील वडूज विभागांतर्गत येणाऱ्या म्हसवड उपकेंद्रातील तीन वाहिन्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही योजना हाती घेतली आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खाजगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशा जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री तथा सहकार व पणन मंत्री ना. शामराव पाटील यांना सहकार्य करण्याचे व त्या भागातील किमान 80 टक्के शेतकऱ्यांना चालू बिले भरण्याचे आवाहन ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
म्हसवड येथे उभारलेला सौर प्रकल्प महापारेषण कंपनीच्या जागेवर असून, त्याची स्थापित क्षमता 6.5 मेगावॅट इतकी आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणच्या म्हसवड उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या देवापूर, धुळदेव व खडकी-भाटकी या तीन कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे.
देवापूर वाहिनीवर म्हसवड, देवापूर, पळसावडे, वीरकरवाडी, बनगरवाडी, शिरताव गावातील 600 कृषीपंप आहेत. त्यांना सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत वीजपुरवठा होईल. तसेच धुळदेव वाहिनीवरील धुळदेवसह हिंगणी व ढोकमोड गावातील 700 कृषीपंपांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज मिळेल. तर खडकी-भाटकी वाहिनीवरील खडकी, भाटकी व मासाळवाडी या गावातील 500 कृषीपंपांना यापुढे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा मिळणार आहे. परिणामी या 12 गावांतील शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागणार नाही.
हा प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे, सातारचे अधीक्षक अभियंता श्री. गौतम गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मुंडे यांचेसह महावितरण व महापारेषणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments