Breaking News

फलटण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा - फलटण तालुका काँग्रेस कमिटी

पाऊसकाळ संपताच रस्ते केले जातील - मुख्याधिरी यांचे आश्वासन

        फलटण दि. 20 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरातील रस्त्यांच्या दुरवस्था झाली असून भुयारी गटार योजनेमुळे व अतिवृष्टीमुळे शहरातील सर्व रस्ते खराब झाले आहेत, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे,तरी फलटण शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी व सर्व सामान्य फलटणकरांना दिलासा द्यावा अशी मागणी नगरसेवक सचिनभैय्या सुर्यवंशी बेडके यांनी केली आहे.

        फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने फलटण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणी संदर्भात नगरसेवक सचिनभैय्या सुर्यवंशी बेडके  यांच्या नेतृत्वाखाली व महेंद्रभैय्या सुर्यवंशी बेडके यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते पंकज पवार, अमिरभाई शेख, सिद्धार्थ दैठणकर, शरद सोनवणे, सुनील गायकवाड, प्रितम जगदाळे, अशोक शिंदे, विजयकुमार भोसले,शंकरराव लोखंडे, एल.जी.बेंद्रे सर,अतुल कांबळे, मोहित बार्शीकर, सोपान जाधव उपस्थित होते.

        निवेदन दिल्यानंतर,  मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून ज्याठिकाणी भुयारी मलनिस्सारण वाहिन्याची कामे पूर्ण झाली आहेत, त्याभागात रस्त्याची कामे पाऊसकाळ थांबताच चालू केली जातील असे आश्वासन दिले.

        फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने, देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,  फलटण शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून,  भुयारी गटार कामामुळे व अतिवृष्टीमुळे संपूर्ण फलटण शहरातील रस्ते खराब झालेले आहेत. यामुळे पादचारी विशेषत: वयोवृध्द व्यक्ती, वाहन चालक यांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भुयारी गटार कामामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे चालताना वयोवृध्द व अपंग व्यक्ती खडडयामध्ये पाय मुरगाळून जखमी झाले आहेत, वाहन चालकांना मणक्याचे विकार झालेले आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे नवीन रस्ता करणे शक्य नाही याची जाणीव आहे, परंतु किमान खड्डे भरुन त्याची दुरुस्ती केली तरी रस्त्यावरुन चालणे किंवा वाहन चालवणे सुखकर होईल. त्यामुळे फलटण शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी व सर्व सामान्य फलटणकरांना दिलासा द्यावा.


No comments