लाईफ लाईन मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची जबाबदारी प्रशासन घेणार का?- श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर

Will the administration take responsibility for the patients treated in the life line?
फलटण (डॉ.श्रीकांत मोहिते) - सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करोना रुग्णांवर उपचारासाठी लाईफ लाईन हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु हे करत असताना त्याठिकाणी नियमित डायलिसिसचा उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांकडे प्रशासनाने एक प्रकारे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशा रुग्णांची जबाबदारी प्रशासन घेणार का? असा सवाल ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत बोलताना श्रीमंत सुभद्राराजे पुढे म्हणाल्या की, फलटण आरोग्य मंडळाच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये सात डायलिसीस मशिन आहेत. महिन्याला याठिकाणी 510 डायलेसिस होत असतात. यातील बहुतांश रुग्ण हे आर्थिक दुर्बल गटातील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. शिवाय डायलिसिस सुरू असताना या रुग्णांना बऱ्याचदा काही त्रास झाल्यास रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे कोणतेही गांभीर्य लक्षात न घेता लाईफ लाईन हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना या रुग्णांचा विचार करून त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात पर्यायी सोय केली आहे का? असे निर्णय घेऊन या रुग्णांच्या जीवाशी प्रशासन का खेळत आहे? असे सवाल उपस्थित करून प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाईफ लाईन हॉस्पिटलमधील जीवनावश्यक डायलिसीस सुविधा बंद होत असल्याने याविरोधात सामाजिक आंदोलन उभे राहण्याची अपेक्षाही श्रीमंत सुभद्राराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments