Breaking News

सभापती श्रीमंत रामराजे यांनी विरोधकांना सुनावले खडे बोल ; विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे

 

Neelam Gorhe elected as Deputy Speaker of the Legislative Council
        मुंबई, दि. 8 : विधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक अखेर पार पडली आहे. भाजपने ऐनवेळी हायकोर्टात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. पण, शिवसेनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

        सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली.

        उपसभापतीपदाच्या निवडणुकीला आक्षेप घेत भाजपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक घेण्याचा हा सभापतीचा अधिकार असून तो न्यायालयीन कक्षेत येत नाही, त्यामुळे सभापती म्हणून मी निर्णय घेईन, असं सांगत सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक घेतली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानानंतर नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
         विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ.नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

        महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम प्राधान्य असते.  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या स्वतः धावून जातात. निलमताईंची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून  त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे शुभेच्छापर भाषण  करतांना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments