कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ ऑगस्ट २०२५ - कोल्हापूर सर्किट बेंच लढा मी मागील 30 वर्षापासून अनुभवला आहे, कारण मी स्वतः दोन-तीन वर्ष पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये तसेच फलटणच्या लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कायदा शिकवलेला आहे. त्याच बरोबर थोडी वकिलीही केली आहे. माझ्या पालकमंत्री व सभापती कालावधीत कोल्हापूर सर्किट बेंच होण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. मुंबई हायकोर्टात कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील माणूस, ज्यावेळेस न्याय घेण्यासाठी मुंबईला येतो, त्यावेळी त्याच्या थांबण्यापासून ते जेवण व वकिलांच्या फी पर्यंत त्याची होणारी फरपट व हालअपेष्टा मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे, त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंच निर्णयाचा नागरिकांना फायदा होणार असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गंधवार्ताशी चर्चा करताना सांगितले.
सर्किट बेंच ही कल्पना तशी ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली आहे, हे न्याय व अधिकाराचे विकेंद्रीकरण आहे, जसं औरंगाबाद खंडपीठ झालं, त्याच धर्तीवर आज कोल्हापूर सर्किट बेंचला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला हायकोर्टापर्यंत पोहोचणं व न्याय मिळवणं सोपं होणार असल्याचे सांगून श्रीमंत रामराजे यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई गोवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सर्व मुंबई बेंचचे सदस्य व वकील मंडळीचे आभार मानले व कोल्हापूर सर्किट बेंचला शुभेच्छा दिल्या.
विधान परिषदेची माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर सर्किट बेंच लढ्यात त्यांच्या सभापती काळात योगदान दिले आहे. दिनांक 11 मार्च 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून, कोल्हापूर येथे बॉम्बे उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ स्थापन करण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अपॉइंटमेंट मिळवून देण्याबाबत मागणी केली होती. त्या संदर्भात मुंबई विधान भवनात बैठक आयोजित करून, त्यावर चर्चा घडवून आणली होती.
No comments