कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
फलटण दि. 28: कृषि उत्पन्न बाजार समिती,फलटण ची सन 2025-26 या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता बाजार समितीचे मुख्य कार्यालय, मार्केट यार्ड,फलटण येथे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 मधील कलम 27 (अ) नुसार आयोजित करण्यात आलेल्या या सभेत बाजार समितीच्या कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणेत आली. सभेच्या प्रारंभी राज्याचे उपमुखमंत्री मा.अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झालेबाबत तसेच फलटण बाजार समितीचे माजी चेअरमन विजयराव बोरावके,पोपटराव काकडे यांचे निधन झाल्याने तसेच अहवाल सालात शेतकरी ,बाजार घटक,सहकार,पणन,कला,शैक्षणिक,सामजिक राजकीय,वीर जवान आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे निधन झाले बद्दल दुःखट्याचा ठराव मांडण्यात आला व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणेत आली.
समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविक करत असताना शेतकऱ्यांच्या मुलांनी सामाजिक,वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे ही बाब विचारात घेऊन "फलटण प्राईड" या नावाने फलटण बाजार समितीच्या वतीने फलटण प्राइड म्हणून गौरव करणेबाबतचे नियोजन करणेत येत असल्याचे सांगितले तसेच बारा पेट्रोल पंप मंजूर असले तरी सर्व पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाची व्याप्ती आणि समितीचा स्टाफ विचारात घेता सहा पेट्रोल पंपावरच आता बाजार समितीस थांबावे लागत असल्याचे आणि त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी असावी असे स्पष्ट केले आणि त्यास मंजुरी देणेत आली.
समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी अहवाल वाचन केले.विषयपत्रिकेवरील विषयावर माहिती घेणेत आली. सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणेत आले त्यानंतर सन 2025-26 चा वार्षिक अहवाल, ताळेबंद व उत्पन्न खर्च पत्रकाची माहिती सभेसमोर मांडणेत आली तसेच सन 2026-27 च्या वार्षिक अंदाजपत्रकाची माहिती व सन 2024 -25 च्या शासकीय वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती सभेत समितीची सचिव श्री.शंकरराव सोनवलकर यांनी दिली. सभाध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.यामध्ये बाजार समितीचे संस्थापक महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर यांचे आणि ज्यांच्यामुळे फलटण तालुक्यात दुसरी हरित क्रांती घडून आली असे नेतृत्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे तैलचित्र बाजार समितीचे मध्ये लावण्याचा सर्वानुमते निर्णय घेणेत आला.
समितीचे चेअरमन रघुनाथराजे व त्यांचे सर्व सहकारी यांचे बाजार समिती विषयक कामकाज चांगल्या प्रकारचे असल्यानेच बाजार समितीस सलग चौथ्यादा वसंतदादा पाटील स्मृति पुरस्कार मिळाला आहे असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
प्रसंगी मा.आमदार दीपकराव चव्हाण यांनी बाजार समितीचे शिवभोजन,मालोजी शिदोरी,शासकीय धान्य खरेदी व पेट्रोल पंप या उपक्रमांचे कौतुक केले.
मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी राबवलेले विविध उपक्रम तसेच संचालक मंडळ व स्टाफ यांचे टीमवर्क तसेच संस्था सातत्याने प्रगतीपथावर असलेचे नमूद केले.
सर्वसाधारण सभेला यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मा. सभापती महाराष्ट्र विधान परिषद, दिपकराव चव्हाण, माजी आमदार, फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद, सातारा, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक, फलटण नगर परिषद, फलटण, जिल्हा परिषद सदस्य सौ. ज्योती मोरे व सौ वैशाली कांबळे उपस्थित होत्या तसेच पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, तसेच कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे इत्यादी मान्यवर तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, फलटण तालुका जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष संजय भगत,हमाल मापाडी प्रतिनिधी अडते व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे व्हाइस चेअरमन भगवानराव होळकर संचालक ज्ञानदेव गावडे,तुळशीराम शिंदे,दीपक गौंड,शंभूराज पाटील,सचिन लोखंडे,संचालिका सौ.सुनीता रणवरे, सौ.जयश्री सस्ते,प्रवीण खताळ,किरण शिंदे,अक्षय गायकवाड,संतोष जगताप, संजय कदम ,समर जाधव, निलेश कापसे व ॲडव्हाजरी पॅनल सदस्य मोहनराव निंबाळकर, पोपटराव बुरुंगले, मोहनराव डांगे, अमोल रासकर, रवींद्र कदम, बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव शंकरराव सर्जेराव सोनवलकर व सहकारी सर्व स्टाफ उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले व बाजार समितीचे संचालक संतोष जगताप यांनी आभार व्यक्त केले.

No comments