जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचा दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघ आणि विकास सेवा सोसायटी मतदारसंघ अशा दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या संचालकांच्या २१ जागांसाठी २ हजार १९ मतदार मतदान करणार असल्याने प्रत्येक मतदारसंघातील राजकीय तसेच संस्थात्मक समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसोबतच विविध पॅनेलच्या बांधणीसाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवार निश्चितीपासून पॅनेलची जुळवाजुळव आणि मतदारसंघनिहाय रणनीती आखण्यास पुढील काळात वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून १ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

No comments