Breaking News

लायन्स चळवळीचे ज्येष्ठ सेवाभावी कार्यकर्ते जगजीवन गरवालीया(मिस्त्री) यांचे निधन

Senior Lions Movement volunteer Jagjivan Garwalia (Mistry) passes away

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ : बॉम्बे फर्निचर फलटणचे सर्वेसर्वा, फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच श्री माळजाई मंदिर व उघडा मारुती मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
    फलटणमध्ये सुमारे ५८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय लायन्स चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी गरवालीया हे शेवटचे पाईक होते. त्यांनी आपले आयुष्य सातत्याने समाजसेवेला वाहून घेत विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रांत सक्रिय योगदान दिले. त्यांच्या निधनाने फलटणच्या लायन्स परिवाराची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याची भावना लायन्स भोजराज नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
    प्रथितयश फर्निचर व्यवसायामुळे अनेक दशके ते ‘मिस्त्री’ या नावाने परिचित होते. या ओळखीचा त्यांना विशेष अभिमान होता. लायन्स क्लब फलटणचे चार्टर मेंबर म्हणून त्यांनी क्लबच्या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. तसेच श्री माळजाई देवस्थान ट्रस्ट, उघडा मारुती देवस्थान ट्रस्ट आणि लायन्स क्लब फलटण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.
    लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे चेअरमन म्हणूनही त्यांनी मनोभावे कार्य केले. आतिथ्यशील, प्रेमळ आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी तसेच समाजातील सर्व घटकांशी स्नेहपूर्ण संबंध होता. त्यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

No comments