हुमणी अळीचे नियंत्रण फुले मेटारायझियमच्या जैविक पर्यायामुळे होतय शक्य - शेतकऱ्यांना दिलासा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास उसाच्या मुळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पादनात घट येते. या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात असला तरी त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता जैविक उपायांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यासाठी ‘फुले मेटारायझियमचा’ हा जैविक पर्याय प्रभावी ठरत आहे.
हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेले हे जैविक कीटकनाशक महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथील जैविक कीड नियंत्रण प्रकल्पात तयार केले जाते. कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील कार्यानुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या उत्पादनाच्या निर्मितीचे व वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे.डॉ.नजीर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या उपक्रमात काम करत आहेत.
अनेक किडींवर परिणामकारक
मेटारायझियम ही उपयुक्त बुरशीजन्य जैविक कीटकनाशक असून हुमणीसह अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे आणि तुडतुडे यांसारख्या विविध किडींच्या नियंत्रणासाठी तिचा उपयोग करता येतो. ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी आदी पिकांमध्येही त्याचा वापर केला जातो.
विशेषतः पावसाळ्यात ऊस क्षेत्रात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीला हुमणीची अळी जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करते. त्यानंतर ती ऊसाच्या मुळांवर हल्ला करते. मुळांना इजा झाल्याने उसाची वाढ मंदावते, पाने पिवळी पडतात आणि गंभीर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण बेट वाळण्याची शक्यता असते.
बुरशीद्वारे किडीचा नायनाट
मेटारायझियमची बुरशी हुमणीच्या शरीरावर वाढून तिच्या शरीरात प्रवेश करते. त्यानंतर बुरशीची वाढ होत जाऊन अळीचा मृत्यू होतो. संपर्कात आलेली हुमणी साधारणपणे १० ते १५ दिवसांत नष्ट होते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी हा पर्यावरणस्नेही उपाय उपयुक्त ठरू शकतो.
‘फुले मेटारायझियम’ साधारण २०० प्रति किलो दराने उपलब्ध असून शेतकऱ्यांना आकर्षक सवलती मध्ये दिले जाते अगदी कमी आणि परवडणाऱ्या दरात जैविक कीड नियंत्रणाची सुविधा मिळते.
शेतकऱ्यांनी असा करावा वापर
उसासाठी : एकरी सुमारे ८ किलो मेटारायझियम शेणखतात मिसळून शेतात पाचटावर किंवा जमिनीवर समप्रमाणात द्यावे.
लागवडीनंतर :पहिल्या पाण्यानंतर पंपाद्वारे सुमारे १५० ग्रॅम मेटारायझियम* घेऊन नॉझल काढून ते सरीमध्ये सोडता येते.
आळवणी साठी: 10 ग्रॅम फुले मेटारायझीम प्रति 1 लिटर पाण्यासाठी
खोडवा पिकासाठी :वरील प्रक्रिया १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा* करणे अपेक्षित आहे.
रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे निर्माण होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक कीड व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘फुले मेटारायझियम’ हे ऊस उत्पादकांसाठी हुमणी नियंत्रणाचे प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक साधन ठरत आहे.

No comments