फलटणमध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ६ टन निर्माल्य संकलित
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने फलटण येथे पर्यावरणपूरक उपक्रम राबवित सुमारे ६ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पंढरपूर पूल तसेच इरिगेशन बंगला, कोळकी येथे शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात सुमारे ४०० ते ४५० श्रीसदस्यांनी सहभागी होत दिवसभर नागरिकांकडून निर्माल्य संकलित केले. गणेशोत्सव काळात निर्माल्य नदी अथवा जलस्रोतांमध्ये विसर्जित झाल्याने होणारे पाणी प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
संकलित केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार असून, हे खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना वापरण्यात येणार आहे. त्यामुळे निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन होण्याबरोबरच त्याचा पर्यावरणपूरक पुनर्वापरही केला जाणार आहे.
दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे फलटण शहरासह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

No comments