Breaking News

मनातील ताण मोकळा करा, समुपदेशनातून जीवनाला नवी दिशा द्या! - डॉ. दीपक राऊत

Release the stress in your mind, give a new direction to your life through counseling! - Dr. Deepak Raut

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० : “मानसिक समस्या लपवू नका, मनमोकळेपणाने संवाद साधा आणि गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घ्या,” असा मोलाचा संदेश मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. दीपक रामचंद्र राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

    मुधोजी महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत समुपदेशन केंद्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानसिक आरोग्य – आव्हाने आणि उपाय’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. राऊत विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते.

    विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक ताणतणाव, परीक्षेची भीती, अपयश, करिअरविषयक संभ्रम, भावनिक अस्वस्थता आणि आत्मविश्वासाचा अभाव यांसारख्या समस्यांवर डॉ. राऊत यांनी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचार, भावनांचे योग्य व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि विश्वासू व्यक्तींशी संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समुपदेशन घेणे ही कमजोरी नसून स्वतःच्या मानसिक आरोग्याप्रती असलेली सजगता आहे, असे स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील समुपदेशन केंद्राच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय समुपदेशन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. एन. के. रासकर यांनी करून दिला. यावेळी आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. जे. पी. बोराटे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. एल. सी. वेळेकर, प्रा. डॉ. प्रशांत शेट्ये आणि प्रा. डॉ. सागर निकम उपस्थित होते.

    या सत्रात बी.कॉम.च्या विविध वर्गांतील एकूण ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. ललित वेळेकर यांनी केले, तर आभार श्रेया भापकर हिने मानले. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून समुपदेशनाबाबतचा संकोच दूर करण्यासाठी हे मार्गदर्शन सत्र उपयुक्त ठरले.

No comments