आपली फलटण मॅरेथॉन ; २५ ऑक्टोबरला ; आरोग्य, आनंद आणि अवयवदानाचा संदेश देत हजारो धावपटू धावणार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ : धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळून नियमित व्यायामाची सवय लागावी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’चे आयोजन २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन येथे करण्यात आले आहे. यंदा या मॅरेथॉनचे दशकपूर्ती वर्ष असून ‘Run for Health & Happiness’ ही यंदाची थीम आहे.
जागतिक अस्थिरोग दिनाच्या निमित्ताने आयोजित या मॅरेथॉनमधून आरोग्यासोबतच अवयवदानाचा संदेशही देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण आणि बालकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी विविध प्रकारच्या धावण्याच्या आणि वॉकथॉनच्या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत.
२१ किमी, १० किमी आणि ५ किमी या शर्यतींसाठी १८ ते ६४ वर्षे वयोगटातील सहभागींसाठी स्वतंत्र वयोगट करण्यात आले आहेत. याशिवाय १२ वर्षांवरील सहभागींसाठी यंदा प्रथमच ३ किमी ‘फन रन’चे आयोजन करण्यात आले आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमी वॉकथॉन विनामूल्य ठेवण्यात आली आहे.
या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ किमी वॉकथॉन होणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, अशा प्रकारची वॉकथॉन देशातील पहिल्यांदाच होत आहे. मॅरेथॉनचा मार्ग ऊस शेती आणि द्राक्षबागांमधून जाणारा निसर्गरम्य ठेवण्यात आला असून धावपटूंसाठी मार्गावर पाणी व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. धावण्यापूर्वी झुंबा वॉर्मअप तसेच धावणीनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या चार वयोगटांमध्ये पुरुष व महिला अशा स्वतंत्र गटांत प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. एकूण ६० पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक मॅरेथॉन रनरला टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि उपयुक्त सरप्राईज गिफ्ट असलेले मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे.
मॅरेथॉनसाठी पुरुषांसाठी ७५० रुपये अधिक कर, महिलांसाठी ५०० रुपये अधिक कर, तर ३ किमी फन रनसाठी ३०० रुपये शुल्क आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमी वॉकथॉन विनामूल्य आहे. ऑनलाइन नोंदणी १४ सप्टेंबरपासून सुरू असून ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी आयोजकांनी दिलेल्या ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments