राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती ; जिल्ह्यात फलटणसह ६ तालुक्यांचा समावेश
मुंबई दि. २६: खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील तूट तसेच अन्य दुष्काळ निदर्शक घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये Trigger-१ (प्रथम कळ) लागू झाल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा, खंडाळा, खटाव, माण, फलटण आणि महाबळेश्वर तालुक्यांचा समावेश.
कृषी आयुक्तांच्या दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार जून महिन्यापासून आतापर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS Coordinates संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तातडीने सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
१२ प्रकारच्या उपाययोजना व सवलती
Trigger-१ लागू असलेल्या २६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष बाब म्हणून शासनाने विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये—
- जमीन महसुलात सूट
- पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून त्यावरील क्षमतेच्या पंपांना सदर सवलत लागू राहणार आहे.
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता देऊन जास्तीत जास्त कामे सुरू करणे
- आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
- टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे
- शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, यासाठी व्यवस्था करणे
- जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे
- जलसंधारणाची कामे सुरू करणे
- यापूर्वी निर्गमित शासन निर्देशांनुसार पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे.
पीक नुकसानीची मदत स्वतंत्र निर्णयाने २६५ तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या करण्यात येणाऱ्या पंचनामे व पीक परिस्थितीच्या सर्वेक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२६०९२६१११७४९४९४१ असा आहे.

No comments