Breaking News

डीजे, प्रेशर हॉर्न आणि नियमबाह्य ध्वनिवर्धकांवर पोलिसांचे लक्ष; मंडळांना नियम पाळण्याचे आवाहन

Police focus on DJs, pressure horns and illegal loudspeakers; Boards urged to follow rules

    सातारा, दि. १९ : प्रतिनिधीगणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विसर्जन मिरवणुकांना वेग येणार असतानाच ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळांना २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीचा अर्थ मनमानी पद्धतीने डीजेचा आवाज वाढविण्याची मुभा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, ध्वनिवर्धक तसेच प्रेशर हॉर्नचा नियमबाह्य वापर होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

    ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनियंत्रणा पुरवठादारांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे मिरवणूक शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

    गणेश आगमनावेळी अनेक मंडळांनी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन केले होते. त्याच पद्धतीने विसर्जन मिरवणुकांमध्येही प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, सात दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन २० व २१ सप्टेंबरला होणार आहे. या कालावधीत ध्वनिक्षेपक वापराबाबतची निर्धारित वेळ लागू राहणार आहे. त्यानंतर २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची सवलत मिळणार आहे.

    या कालावधीत शहरातील विविध गणेश मंडळांचे देखावे रात्री उशिरापर्यंत भाविकांना पाहता येणार आहेत. मात्र, उत्सवाचा उत्साह कायम ठेवताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे भान ठेवणे आवश्यक आहे.

२२ ते २५ सप्टेंबर : रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला सवलत

डीजेचा आवाज ध्वनिमर्यादेत ठेवणे बंधनकारक
प्रेशर हॉर्न व नियमबाह्य ध्वनिवर्धकांना मनाई
मंडळांसह ध्वनियंत्रणा पुरवठादारांचीही जबाबदारी
नियमभंग झाल्यास प्रशासनाकडून कारवाईची शक्यता


No comments