वसतिगृहात पालकांना बोलावल्यामुळे विद्यार्थिनीची मानसिक तणावात तिसऱ्या मजल्यावरून उडी
सातारा, दि. ३ ( प्रतिनिधी) वाय. सी. कॉलेजच्या वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेने सातारा शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती असून, वसतिगृहातील एका प्रकारानंतर पालकांना बोलावण्यात आल्याने ती चिंतेत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने वसतिगृहात काही चूक केल्याचे सांगितले जात असून, त्याबाबत तिच्या पालकांना कॉलेज प्रशासनाकडून बोलावण्यात आले होते. पालकांना सामोरे जाण्याच्या भीतीने आणि मानसिक तणावातून तिने मंगळवारी (दि. २) रात्री सुमारे अकराच्या सुमारास वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थिनीच्या पालकांनी या प्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments