Breaking News

वाय. सी. कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या मृत्यूचे पडसाद; अभाविपचे आंदोलन, चौकशीची मागणी

Y. C. College student's death causes repercussions; ABVP protests, demands inquiry

    सातारा,दि.३:प्रतिनिधीवाय. सी. कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारणांचा छडा लावावा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाविद्यालय परिसरात आंदोलन केले.

    विद्यार्थिनीच्या मृत्यूमागे काही व्यक्तींचा दबाव किंवा मानसिक त्रास कारणीभूत होता का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. संबंधित शिक्षिकेविरोधात विद्यार्थिनीवर दबाव टाकल्याचे आरोप होत असल्याने त्याचीही पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, असे अभाविपकडून सांगण्यात आले.

    घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवरही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूसारख्या संवेदनशील घटनेत प्रशासनाने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दाखविण्यात आले नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

    आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत विद्यार्थिनीच्या मृत्यूची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. घटनेपूर्वी तिच्यासोबत काय घडले, तिच्यावर कोणाचा दबाव होता का, तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी पोलिसांनी करावी, अशी मागणी करण्यात आली.

    दरम्यान, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

No comments