Breaking News

मुधोजी महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या (NEP-2020) सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

One-day workshop on revised syllabus of Chemistry (NEP-2020) successfully concluded at Mudhoji College

    फलटण(गंधवार्ता वृतसेवा) दि. ३ :  फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. भाग-३, सेमिस्टर-५ व ६ रसायनशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन २४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.

    कार्यशाळेचे उद्घाटन मुधोजी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. या प्रसंगी प्रा. (डॉ.) एस. पी. आचार्य, संयोजक व रसायनशास्त्र विभागप्रमुख यांनी कार्यशाळेची प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यशाळेत विशेष प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रा. (डॉ.) आर. व्ही. गुरव, बीजगणित शाखाप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित होते. माननीय प्रा. (डॉ.) आर. के. माने, I/C, BOS अध्‍यक्ष व रसायनशास्त्र विभागप्रमुख, के.आर.बी.पी. महाविद्यालय, इस्लामपूर यांनी बीजभाषण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, तर प्रा. (डॉ.) डी. पी. शिंदे, IQAC समन्वयक यांची विशेष उपस्थिती होती.

    या प्रसंगी प्रमुख पाहुणे पुढे बोलताना म्हणाले की, NEP-2020 सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळेची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि अध्यापन-अधिगम प्रक्रियेमध्ये अपेक्षित व सकारात्मक बदल घडवून आणणे. उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी-केंद्रित, बहुविषयक, कौशल्याधारित, क्षमता-विकसनात्मक आणि परिणामाधारित दृष्टिकोन विकसित करणे, अशी विविध उद्दिष्टे या कार्यशाळेतून साध्य होतील.

    महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम सर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून NEP-2020 मधील मूलभूत तत्त्वांचा अभ्यासक्रमरचनेत व शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावीपणे समावेश करून उच्च शिक्षणाची गुणवत्ता, उपयुक्तता आणि परिणामकारकता वाढविणे अशी विविध उद्दिष्टे साध्य झाली. यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होईल.

    कार्यशाळेत सेंद्रिय, असेंद्रिय आणि भौतिक रसायनशास्त्र या विषयांवर स्वतंत्र सत्रे घेण्यात आली. सेंद्रिय रसायनशास्त्रासाठी प्रा. (डॉ.) एस. एम. खेत्रे, असेंद्रिय रसायनशास्त्रासाठी प्रा. (डॉ.) एस. एच. बुंगले आणि भौतिक रसायनशास्त्रासाठी प्रा. (डॉ.) ए. आर. सुपले यांनी मार्गदर्शन केले.

    दुपारच्या सत्रात भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम (SEC) आणि क्षेत्रीय पर्यकल्प (FP) यावर मार्गदर्शन व चर्चा झाली. प्रा. (डॉ.) जी. एच. निकम यांनी IKS विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर SEC व FP संदर्भात चर्चा आयोजित करण्यात आली.

    कार्यशाळेच्या समारोप सत्रात सहभागी प्राध्यापकांचा अभिप्राय घेण्यात आला व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम होते. डॉ. एम. पी. पाटील यांनी आभार मानले, तर श्रीमती जे. एस. काळेळ व डॉ. चव्हाण मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

    या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांतून एकूण १०० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मुधोजी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विशेषतः रसायनशास्त्र विभागातील सर्व स्टाफचे सहकार्य लाभले.

No comments