चोरीस गेलेले सोने व पाण्याच्या मोटारी पोलिसांनी फिर्यादींना केल्या परत
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ : साखरवाडी येथील घरातून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच विडणी येथील विहिरीवरून चोरीस गेलेल्या पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करून फलटण ग्रामीण पोलिसांनी संबंधित फिर्यादींना परत केल्या. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे फिर्यादींनी कौतुक करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
साखरवाडी येथील बाळासाहेब आबासाहेब चव्हाण यांच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरीस नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपी निष्पन्न केला. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
हस्तगत केलेले दागिने आज फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ व पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांच्या उपस्थितीत फिर्यादी बाळासाहेब चव्हाण यांच्याकडे परत करण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेळेत तपास करून चोरीस गेलेले सोने परत मिळवून दिल्याबद्दल चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, विडणी येथील तुषार अभंग व संतोष जगताप यांच्या विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरीस नेल्या होत्या. या प्रकरणीही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न करून चोरीस गेलेल्या इलेक्ट्रिक मोटारी जप्त केल्या.
जप्त केलेल्या मोटारीही आज प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ व पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांच्या उपस्थितीत संबंधित फिर्यादींना परत करण्यात आल्या. पोलिसांनी तातडीने तपास करून मोटारी परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादींनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार करण्यात आली. प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे व हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments