जिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
सातारा, दि. ३१ : सन २०२६ चा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत असून, उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धर्मादाय आयुक्त, स्थानिक पोलीस अथवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आवश्यक परवानगी घेतलेली नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पात्र असतील.
पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या
ganeshostav.pldmka.co.in या पोर्टलवर दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
ऑनलाइन अर्ज केलेल्या मंडळांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येणार आहे. या समितीमार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट एका गणेशोत्सव मंडळाची निवड करून त्याची शिफारस राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येईल.
राज्यस्तरीय विजेत्यांना आकर्षक पारितोषिके
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
- प्रथम क्रमांक – ₹७.५० लाख
- द्वितीय क्रमांक – ₹५ लाख
- तृतीय क्रमांक – ₹२.५० लाख
याशिवाय जिल्हास्तरीय समितीमार्फत निवड झालेल्या जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या मंडळांनाही पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
- प्रथम क्रमांक – ₹५० हजार
- द्वितीय क्रमांक – ₹४० हजार
- तृतीय क्रमांक – ₹३० हजार
या स्पर्धेसाठीचे निकष महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्र. पुलदे २०२५/प्र.क्र.११५ (१२६४४६७)/सां.का.२, दि. १७ ऑगस्ट २०२६ मध्ये नमूद करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक परंपरांचे जतन, पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक सलोखा आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments