पर्यावरणपूरक पद्धतीने कालकथित पोपटराव काकडे यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न
फलटण, दि. २० : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन, माजी संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक, सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व कालकथित पोपटराव मारुती काकडे यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्याच्या सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हिंगणगाव (ता. फलटण) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कालकथित पोपटराव काकडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. प्रारंभी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर जय भवानी एज्युकेशन सोसायटीमध्ये माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर सहकार क्षेत्रात प्रवेश करून १९८४ ते १९९३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तर १९९३ ते १९९८ या कालावधीत चेअरमन म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व केले.
माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे ते निष्ठावान सहकारी होते. त्यांच्या सहवासात त्यांनी राजकीय, सामाजिक व विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दोन वेळा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला नियमन सुरू करण्यात आले तसेच स्वतंत्र फळ-भाजीपाला बाजाराची स्थापना करण्यात आली. बाजार समितीचे संचालक असतानाच ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. समाजकल्याण समितीचे स्वीकृत सदस्य तसेच जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले.
जाधववाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनानंतर हिंगणगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच हिंगणगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर आज हिंगणगाव येथे भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालय सचिव, बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक चंद्रकांत मोहिते यांच्या हस्ते बौद्ध पद्धतीने अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न करण्यात आला.
यावेळी माणिकराव काकडे, विनायक काकडे, शुद्धोधन काकडे, प्रतीक काकडे, नितीन काकडे, मंगेश काकडे, राजरत्न काकडे, अजय वाघमारे सर, मयूर वाघमारे, पृथ्वीराज धाईजे, मयुरेश कदम, प्रथमेश कदम, प्रणव वाघमारे, महेंद्र काकडे (महिपत), सौरभ धाईंजे, राजश्री डापरे तसेच समस्त काकडे परिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. नदी किंवा इतर जलस्रोतामध्ये अस्थी विसर्जित करून पाणी प्रदूषित न करता, कालकथित पोपटराव मारुती काकडे यांच्या शेतामध्ये त्यांचे बंधू माणिकराव काकडे, पुत्र शुद्धोधन काकडे तसेच संपूर्ण काकडे परिवाराच्या उपस्थितीत बोधीवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्या वृक्षांच्या खड्ड्यात स्व. काकडे यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
पर्यावरणपूरक अस्थिविसर्जनाचा हा आदर्श उपक्रम उपस्थितांनी मनापासून गौरविला. "माणूस जातो, पण त्याच्या स्मृती जिवंत राहतात; त्या स्मृतींना वृक्षरूप देऊन निसर्ग संवर्धनाची नवी परंपरा निर्माण करणे, हीच कालकथित. पोपटराव काकडे यांना खरी आदरांजली आहे," अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments