Breaking News

प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन : आ. श्रीमंत रामराजे

Special lecture series organized throughout the year to mark the birth centenary of Principal Shivajirao Bhosale: A. Shrimant Ramraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून वर्षभर विविध विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. मुधोजी महाविद्यालयात आयोजित प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी रामराजे म्हणाले, "प्राचार्य शिवाजीराव भोसले हे सरस्वतीचे उपासक होते. त्यांच्या वक्तृत्वातून सहज, ओघवत्या आणि लयबद्ध शब्दांची बरसात होत असे. त्यांचे भाषण केवळ मनोरंजन करणारे नव्हते, तर समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते." जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी देशातील नामवंत विचारवंतांना फलटणमध्ये व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा प्राचार्य भोसले यांच्या पुतणी डॉ. शैलजा माने यांनी 'आमचे बापू' या विषयावर बोलताना प्राचार्य भोसले यांच्या कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध जपले आणि आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही, असे त्या म्हणाल्या. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सलग २० वर्षे व्याख्याने देत त्यांनी महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक केली, असेही त्यांनी सांगितले.

    अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी प्राचार्य भोसले यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. "मला त्यांचा पन्नास वर्षांचा सहवास लाभला. ते माझे शिक्षण क्षेत्रातील गुरु होते. त्यांच्या चरित्रलेखनाचे काम सुरू असून ते जन्मशताब्दी वर्षात प्रकाशित करण्यात येईल," अशी माहिती त्यांनी दिली.

    यावेळी तत्त्वज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक आर. व्ही. फरतारे, भूगोल विभागाचे एस. बी. इनामदार तसेच माजी विद्यार्थी अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. एन. के. रासकर यांनी करून दिला. प्रारंभी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, प्रा. सी. डी. पाटील, प्राचार्य अरविंद निकम, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब चोरमले, मुगुटराव कदम, प्राचार्य भोसले यांचे हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाने ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. तसेच ग्रंथालय विभागाच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या साहित्याचे विशेष पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय दीक्षित आणि प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले, तर आभार डॉ. पी. आर. पवार यांनी मानले.

No comments