फलटणमध्ये नव्याने उभारलेला विजेचा खांब कोसळला; दोन शेतकरी गंभीर जखमी, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २५ जुलै : फलटण येथील शासकीय विश्रामगृहासमोर नव्याने उभारण्यात आलेला विजेचा खांब अचानक कोसळल्याने दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली आणि संदीप चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.
दरम्यान, फलटण शहरात नव्याने उभारण्यात आलेले विजेचे खांब वारंवार कोसळत असल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का किंवा कामात निष्काळजीपणा झाला का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेनंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.

No comments