Breaking News

ताथवडा डोंगरावर देशी वृक्षारोपण मोहीम उत्साहात; ‘एक व्यक्ती – एक देशी वृक्ष’ संकल्पाचा निर्धार

 

Native tree plantation campaign in full swing on Tathawada hills; determination to uphold the resolution of 'One person – one native tree

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २४ जुलै :  नेचर अँड वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटी, फलटण यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ताथवडा डोंगर, फलटण वनपरिक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेली देशी व निसर्गपूरक वृक्षारोपण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

    या मोहिमेत फलटण वन विभाग, फलटण रनर्स फाउंडेशन, रोटरी क्लब, फलटण डॉक्टर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, गोविंद फाउंडेशन तसेच अनेक स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी डॉ. मोहित व्होरा आणि आजचे सर्वात लहान स्वयंसेवक हनुमंत जगताप यांनी वाढदिवसानिमित्त देशी वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.

    मागील वर्षी याच ठिकाणी लावण्यात आलेल्या देशी वृक्षांची पाहणीही यावेळी करण्यात आली. त्यापैकी अनेक वृक्ष जोमाने वाढलेले पाहून सहभागींचा उत्साह द्विगुणित झाला. त्यातून प्रेरणा घेत यंदाही मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

    यावेळी प्रत्येकाने "एक व्यक्ती – एक देशी वृक्ष" हा संकल्प स्वीकारत वृक्ष लागवडीबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी संस्था, स्वयंसेवक आणि निसर्गप्रेमींचे आयोजकांनी आभार मानले. वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता लावलेल्या प्रत्येक देशी वृक्षाचे संगोपन करून हरित, पर्यावरणपूरक आणि समृद्ध फलटण घडविण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments