फलटण येथे पालखी सोहळ्यात “चरण सेवा” उपक्रम ; हजारो वारकऱ्यांना दिलासा
"Charan Seva" initiative during the palanquin ceremony in Phaltan; Relief for thousands of Warkaris
सातारा दि.17 :- श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे मुख्यमंत्री सहायता योजनेतून तसेच आरोग्य विभागाच्या वतीने “चरण सेवा” हा उपक्रम राबविण्यात आला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयोजित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.
पालखी सोहळ्यात दीर्घ पल्ल्याचा पायी प्रवास करताना वारकऱ्यांना पायांमध्ये वेदना, सूज व थकवा जाणवतो. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ही अभिनव संकल्पना राबवत वारकऱ्यांना पायांची मालिश (मसाज) करून दिलासा देण्याचे काम केले.
फलटण येथील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. रविराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांचे पाय स्वच्छ करून त्यांना औषधी तेलाने मसाज करून सेवा केली. या सेवेमुळे वारकऱ्यांना मोठा आराम मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.
वारकरी संप्रदायातील सेवा आणि भक्ती यांचे अनोखे दर्शन या उपक्रमातून घडले. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी केलेल्या या सेवाकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments