Breaking News

फलटण नगरपरिषदेतील कर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल; फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

Case registered in Phaltan Municipal Council tax evasion case; Police appeal to citizens to come forward if they have been cheated

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २९ जुलै २०२६ :  फलटण नगरपरिषदेतील मालमत्ता कर, घरपट्टी व पाणीपट्टीच्या रकमेच्या अपहारप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नागरिकांनी कर भरूनही अधिकृत पावती मिळाली नसेल किंवा फसवणुकीची शंका असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मार्च २०२२ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत फलटण नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप अरुण काकडे, नितीन देवदास वाळा आणि शरद माधव अहिवळे (सर्व रा. फलटण) यांनी नागरिकांकडून मालमत्ता कर, घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम स्वीकारून ती शासनाकडे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ₹१,५०,३९९ रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे फलटण नगरपरिषद व संबंधित मालमत्ता धारकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

    याप्रकरणी फलटण नगरपरिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक जगदीश माळी यांच्या तक्रारीवरून दि. २८ जुलै २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे करीत आहेत.
नागरिकांना आवाहन

    ज्या नागरिकांनी यापूर्वी फलटण नगरपरिषदेत मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी किंवा इतर कोणताही कर भरला असेल, मात्र अधिकृत पावती मिळाली नसेल किंवा फसवणूक झाल्याची शंका असल्यास त्यांनी तातडीने फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
संपर्कासाठी घनश्याम बल्लाळ, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे – ९८८११४९६०१, मिठू जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे – ९०२११९६०२२

No comments