तावडीच्या कु. शिवांजली भोसलेची एमपीएससीत घवघवीत यश; ड्रग इन्स्पेक्टर (क्लास-२) पदावर निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २५ जुलै : फलटण तालुक्यातील तावडी येथील कु. शिवांजली शालिनी रणधीर भोसले हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या २०२५-२६ च्या परीक्षेत ड्रग इन्स्पेक्टर (क्लास-२) पदावर निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात राज्याच्या खुल्या गुणवत्ता यादीत (Open Merit) ३८ वा क्रमांक, तर मागासवर्गीय प्रवर्गात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शिवांजलीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, तावडी येथे, माध्यमिक शिक्षण वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, फलटण येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथे झाले. बी. फार्मसीचे शिक्षण तिने गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड येथून पूर्ण केले.
शालेय जीवनापासूनच अभ्यासासोबत वादविवाद, वक्तृत्व, नृत्य आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारी विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. अभ्यासातील प्राविण्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळाल्याचे तिने सांगितले.
शिवांजलीचे वडील रणधीर भीमराव भोसले हे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते असून मानवी हक्क संरक्षण संघटनेचे कार्यकर्ते आहेत. तर आई शालिनी रणधीर भोसले या उच्चशिक्षित (एम.ए., डी.एड.) असून त्यांनी लहानपणापासून शिक्षणासोबत समाजसुधारकांचे विचार आणि वाचनाची आवड जोपासण्याची प्रेरणा दिल्याचे शिवांजलीने सांगितले.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाल्याचे सांगत, "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश आपल्या यशामागील प्रेरणास्थान असल्याचे तिने नमूद केले.
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे फलटण तालुका अध्यक्ष अमोल आढाव हे शिवांजलीचे मामा असून गुणवरे येथील आजी-आजोबांकडूनही शैक्षणिक संस्कार मिळाल्याचे तिने सांगितले.
शिवांजलीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण, बारामती, सातारा, पुणे आणि मुंबई परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments