खंडणीप्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार आरोपी डी.बी. पथकाच्या जाळ्यात; फलटण शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २९ जुलै २०२६ : खंडणी, मारहाण व दुकानाची तोडफोड प्रकरणातील तब्बल दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला फलटण शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने शिताफीने अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फलटण येथील किंग युनिसेक्स पार्लरमध्ये दोन जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी दुकानात घुसून शिवीगाळ केली. त्यापैकी एका आरोपीने कमरेतील सुमारे दोन फूट लांबीचे धारदार लोखंडी हत्यार दाखवत स्वतःला "अभि भाई" म्हणून ओळख करून दिली. दुकान चालवायचे असेल तर दरमहा ₹१० हजार हप्ता द्यावा, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत दुकानातील व्यक्तींना मारहाण केली आणि दुकानातील साहित्याची तोडफोड केली.
या घटनेनंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी अभिजीत अरुण जाधव (रा. मलठण, ता. फलटण) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, दुसरा आरोपी अक्षय संजय जाधव (रा. मलठण, ता. फलटण) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने विशेष शोधमोहीम राबवली. सातत्याने तपास करून अखेर आरोपी अक्षय संजय जाधव याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई डी.बी. पथकातील पोलीस हवालदार संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments