२४ तासांत पाण्याचा टँकर चोरीचा गुन्हा उघड ; दोन चोरटे जेरबंद, १३ लाखांचा टँकर हस्तगत
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २९ जुलै २०२६ : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथून चोरीस गेलेला सुमारे ₹१३ लाख किमतीचा पाण्याचा टँकर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत शोधून काढत दोन चोरट्यांना अटक केली आहे. आरोपी टँकर विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधत असतानाच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडेगाव (ता. फलटण) येथील शेती संशोधन केंद्राजवळील मोकळ्या जागेत सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा. लि., फलटण या कंपनीचा एमएच-१२-डीटी-३१३९ क्रमांकाचा पाण्याचा टँकर पार्क करण्यात आला होता. २६ जुलै ते २८ जुलैदरम्यान अज्ञात चोरट्यांनी हा टँकर चोरून नेला. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत सुनील लकडे (वय २५, रा. लकडे वस्ती, पाडेगाव, ता. फलटण) आणि शुभम विनोद जैस्वाल (वय १८, रा. दगडे वस्ती, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी आहेत अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, लिंबखिंड परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर दोन जण चोरीचा टँकर विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे चोरीचा टँकर व स्प्लेंडर दुचाकीवर बसलेले दोन संशयित आढळून आले. टँकरच्या मालकीबाबत व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशीत त्यांनी पाडेगाव येथून आणखी एका साथीदाराच्या मदतीने टँकर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी ₹१३ लाखांचा टँकर जप्त करून दोघांना अटक केली . या गुन्ह्यातील अन्य साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.

No comments