साहित्यिक संस्थांनी सर्वसमावेशकता जोपासावी - रवींद्र येवले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ जून २०२६ - साहित्य हे माणसाला जगायला शिकवते. साहित्यामध्ये भेदभाव न करता मानवी मूल्ये व मानवता जपण्याचे काम साहित्यिक संस्थानी करणे गरजेचे आहे. साहित्यिक संस्था या जुन्या आणि नवीन कवी, लेखक, नाट्यलेखक, कथालेखक यांचा मेळ घालून पुढे जाण्याचे बळ देत असतात. अशा संस्थांची आज गरज आहे. साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून साहित्याची मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे त्यासाठी साहित्यिक संस्थांनी सर्वसमावेशकता जोपासावी, असे प्राचार्य रवींद्र येवले यांनी साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाना नानी पार्क फलटण येथे आयोजित 39 व्या साहित्यिक संवाद या कार्यक्रमात मत व्यक्त केले.
यावेळी संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा सुधीर इंगळे, सचिन जाधव, मंगेश कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रवींद्र येवले पुढे म्हणाले की, साहित्य संस्थांमध्ये राजकारण पराकोटीला गेलेले दिसून येत आहेत पैशापुढे जग फिके पडत आहे, त्यामुळे साहित्यिकांनी सजगता बाळगणे काळाची गरज आहे. संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की, सध्याच्या काळात पेपर फुटीचे प्रमाण वाढत चालले आहे, ही बाब गंभीर असून त्यावर काही ठिकाणी आपले सडेतोड विचार मांडणे गरजेचे आहे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सरकारला व विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. वृक्षतोड, पेपर फुटी, वाढते तापमान या बाबी फार भयंकर होत चालल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी सकारात्मक राहून योग्य वेळी योग्य बाबीवर प्रहार करणे गरजेचे आहे.सामाजिक समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. मानवी मूल्य व मानवता जपायची असेल तर सर्वांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.
प्रा. सुधीर इंगळे म्हणाले की, ज्या देशाचा शैक्षणिक दर्जा ढासळतो तो देश लवकरच रसातळाला जातो. शिक्षक जर भ्रष्ट झाला तर तो देश भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही.आज शैक्षणिक क्षेत्राची वाताहात झालेले वातावरण पाहिले तर त्यावरती विश्वासच बसत नाही. यावर कोणताच राजकीय पक्ष बोलताना दिसून येत नाही.
यावेळी वन्यजीव संघटनेचे सचिन जाधव, मंगेश कर्वे यांनीही वाढत्या तापमानावरती व वृक्षतोडीवरती जोरदार प्रहार केला. आज सर्वासमक्ष जुने वृक्ष तोडले जातात, यावर कोणीही बोलत नाही. यावेळी सचिन भांडवलकर गणेश गुळवे, मयूर शेरखाने, विक्रम भांडवलकर, सुरेश आवळे त्याचबरोबर फलटण शहर व तालुक्यातील साहित्यिक, साहित्य रसिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.

No comments