Breaking News

सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

Sonia Charitable Trust felicitates meritorious students of 10th and 12th with enthusiasm

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ जून : सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने मंगळवार पेठेतील बुद्ध बंगला येथे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास आमदार सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक सनी अहिवळे व नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे हे गेल्या २२ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत हजारो गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शालेय साहित्य, दप्तर, वह्या व पुस्तके देऊन प्रोत्साहन देत आहेत.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवपत्र, दप्तर व शालेय साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांना रोपटी भेट देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी बोलताना आमदार सचिन कांबळे पाटील यांनी सनी व सुपर्णा अहिवळे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत फलटण नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २ ला निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच फलटणमधील मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शिक्षणातूनच समाजपरिवर्तन घडते, असे सांगत सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून नगर परिषद शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी संगणक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

    माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी, “बुद्ध निवासच्या दारात आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही रिकाम्या हाताने पाठवले नाही. भविष्यातही ‘मिशन १०० डॉक्टर-इंजिनिअर’सारखे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू राहील,” असे सांगितले.

    कार्यक्रमास उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी रणजित भोसले, विजय येवले, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका मीना जीवन काकडे, नगरसेवक सुदाम मांडरे, नगरसेविका सिधाली अनुप शहा, बी. टी. जगताप यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश काकडे यांनी केले, तर नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या गुणगौरव सोहळ्यास विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments