‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’ने कर्नल विनोद मारवाह (निवृत्त) यांचा गौरव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ - भारतीय सैन्यदलाचे माजी अधिकारी आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धातील युद्धवीर कर्नल विनोद मारवाह (निवृत्त) यांना राष्ट्रनिर्मिती, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि माजी सैनिकांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.
भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (COAS) यांच्या हस्ते पुण्यात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथील १९६७ बॅचचे माजी विद्यार्थी असलेले कर्नल विनोद मारवाह हे भारतीय सैन्यदलातील गौरवशाली युद्धवीर आहेत. १९७१ मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये नियुक्तीनंतर त्यांनी भारत-पाक युद्धात पश्चिम सीमेवर सक्रिय सहभाग नोंदवला. “Born to Battle” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या NDA च्या ३८ व्या कोर्सचे ते अभिमानास्पद सदस्य आहेत.
१९९२ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी शिक्षण, अक्षय ऊर्जा, बांधकाम, दुग्धव्यवसाय, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक विकास या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य सुरू ठेवले. ग्रामीण महाराष्ट्रात सौरऊर्जेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले असून मुंबई-पुणे महामार्गावरील पहिली सोलर ड्रिप इरिगेशन प्रणाली उभारण्याचा मान त्यांना जातो. जलसंधारण, वृक्षारोपण आणि सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू भागांचे पुनरुज्जीवन यासाठीही त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
कर्नल मरवाहा हे Horizon OPCEM या संस्थेशी संलग्न असून संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत दहा वर्षे मानवतावादी डिमायनिंग (Humanitarian Demining) प्रकल्प राबवण्यात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे. सध्या कुवेतमध्ये युद्धानंतर उरलेल्या माईन्स आणि स्फोटक अवशेष हटविण्याच्या मोहिमेत त्यांची टीम कार्यरत आहे. या उपक्रमांमधून माजी सैनिकांना पुनर्रोजगार उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्यही त्यांनी केले आहे.
सन २००० मध्ये त्यांनी पुण्यात IIEBM या व्यवस्थापन संस्थेची स्थापना केली. प्रामाणिकपणा, सचोटी, जबाबदारी आणि नेतृत्व या मूल्यांवर आधारित व्यवस्थापन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांचा उद्देश आहे. संरक्षण दलातील जवानांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती तसेच माजी सैनिकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही संस्थेमार्फत सुरू आहे.
उद्योगक्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. Magnesia Chemicals, Arista Chemicals, Zusammen Life Sciences तसेच Govind Milk & Milk Products Pvt. Ltd. या उद्योगांद्वारे त्यांनी शाश्वत विकास, हरित ऊर्जा आणि शेतकरी-केंद्रित उद्योग मॉडेल विकसित केले आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्रात त्यांच्या उपक्रमांमुळे सातारा जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होत असून दररोज सुमारे ६ लाख लिटर दूध संकलन केले जाते.
समाजसेवेची जाणीव जपत त्यांनी Col. Vinod Marwaha Foundation ची स्थापना करून शिक्षण, माजी सैनिकांचे पुनर्वसन आणि आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम सुरू केले आहेत. तसेच Taarruf Cultural Foundation मार्फत भारतीय भाषा, साहित्य आणि काव्यपरंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्यही ते करत आहेत.
यावेळी जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कर्नल विनोद मारवाह यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “माजी सैनिकांचे अनुभव आणि सेवा वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी असून राष्ट्रनिर्मितीत त्यांचे योगदान अमूल्य आहे.”
राष्ट्रसेवा, सामाजिक उत्तरदायित्व, शिक्षण आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे कर्नल विनोद मारवाह हे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन राष्ट्रसेवेचा आणि समाजाभिमुख कार्याचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण सन्मान मानला जात आहे.


No comments