Breaking News

'मिनी मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन' उत्साहात संपन्न!

'Mini Marathon Run for Education' concludes with enthusiasm!

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जून - कौशल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज असून, त्याचा प्रसार करणे आणि जनसामान्यांमध्ये आरोग्याचे महत्त्व रुजवणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, असा संदेश फलटण एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त महाविद्यालय) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत आयोजित " मिनी मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन" या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी दूरध्वनीवरून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विविध आधुनिक कोर्सेसची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि निरोगी आरोग्याचा संदेश शहरात पसरावा, म्हणूनच फलटण शहरातून या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

    अतिशय उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

    या ऐतिहासिक आणि शैक्षणिक मॅरेथॉनच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे ट्रेझरर श्री. हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, श्री. शिरीष दोशी, श्री. शिरीष भोसले, शिवाजीराव घोरपडे, पराग दोशी, नितीन गांधी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, यशवंत खलाटे पाटील उपस्थित होते. तसेच  फलटण तालुक्याच्या तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती. सुप्रिया गाडवे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कुमार दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी परिसरातील क्रीडाप्रेमी, नागरिक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    स्पर्धेत मुले आणि मुलींच्या वेगवेगळ्या तीन वयोगटांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. सर्व विजेत्या धावपटूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे आहे.
१) १० ते १७ वर्षे वयोगट: या वयोगटात मुलांमध्ये ओंकार धनाजी सरगर (चेस्ट नं. १४७) याने अव्वल स्थान पटकावत विजेतेपद मिळवले, तर पियुषकुमार बाळासाहेब घुगे (चेस्ट नं. ४९) हा उपविजेता ठरला. मुलींच्या गटामध्ये अबोली नंदकुमार वासके (चेस्ट नं. ५१) हिने प्रथम क्रमांक (विजेती) मिळवला आणि आराध्या माणिक वासके (चेस्ट नं. ६०) हिने द्वितीय क्रमांक पटकावत उपविजेतेपद मिळवले.
२) १८ ते ३९ वर्षे वयोगट:
तरुणांच्या या अत्यंत चुरशीच्या गटात मुलांमध्ये चैतन्य मुकिंदा रुपनर (चेस्ट नं. १५३) याने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले, तर अनिकेत हरीबा देशमुख (चेस्ट नं. १५४) हा उपविजेता ठरला. मुलींच्या गटामध्ये साक्षी संजय जाड्यल (चेस्ट नं. १४९) हिने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर ज्ञानेश्वरी पोपट पेकाळे (चेस्ट नं. ५३) हिने उपविजेतेपद मिळवले.

    ३) ४० वर्षांवरील (प्रौढ) वयोगट:
चाळीशीपुढील अनुभवी धावपटूंच्या गटात पुरुषांमध्ये माणिक नारायण कांबळे (चेस्ट नं. ६) यांनी प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले, तर विशाल धोंडिबा शिलिमकर (चेस्ट नं. ४३) हे उपविजेते ठरले. महिलांच्या गटामध्ये केनियाच्या जेन वांजिरू (चेस्ट नं. ४४) हिने आपल्या उत्कृष्ट वेगाच्या जोरावर विजेतेपद मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, तर रंजना दत्तात्रय शेंडकर (चेस्ट नं. १५) यांनी द्वितीय स्थान मिळवत उपविजेतेपद पटकावले.

    कार्यक्रमाच्या सांगता समारंभात महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी, पोलीस प्रशासन आणि धावपटूंचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या यशस्वी आयोजनाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे कौतुक फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व इतर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments