Breaking News

सैबेरियाहून आफ्रिकेला जाणारा अमूर फाल्कन पहिल्यांदाच फलटणमध्ये ; पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

Amur Falcon, which flies from Siberia to Africa, is seen in Phaltan for the first time; bird lovers are delighted

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ नोव्हेंबर २०२६ :जगातील सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असलेला अमूर फाल्कन (शास्त्रीय नाव - _Falco amurensis_) नुकताच फलटण तालुक्यात आढळून आला आहे. फलटण तालुक्यात या पक्ष्याची ही पहिलीच नोंद असून, यामुळे सातारा जिल्ह्याच्या पक्षी निरीक्षणाच्या इतिहासात एका नव्या पानाची भर पडली आहे.

    सैबेरिया आणि उत्तर चीनमध्ये प्रजनन करणारा हा छोटासा शिकारी पक्षी दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. या प्रवासात तो भारतामार्गे जातो. आतापर्यंत हा पक्षी मुख्यत्वे नागालँड, मणिपूर आणि आसाममध्ये मोठ्या थव्याने दिसत होता. नागालँडमधील दोयांग जलाशय परिसर तर 'फाल्कन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' म्हणून ओळखला जातो. मात्र, आता तो फलटणमध्ये आढळल्याने त्याच्या स्थलांतर मार्गाबद्दल नव्याने संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

    गणेश धुमाळ ,रवींद्र लिपारे - पक्षी निरीक्षक व  वण्याजिव छायाचित्रकार, नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी फलटण चे सदस्य* यांनी फलटण परिसरात हा पक्षी पाहिला आणि त्याचे छायाचित्रण केले. सुरुवातीला तो सामान्य बाज वाटला, मात्र त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंग, आकार आणि उडण्याच्या पद्धतीवरून तो अमूर फाल्कन असल्याचे निष्पन्न झाले.

    अमूर फाल्कन - थोडक्यात माहिती
- शास्त्रीय नाव: _Falco amurensis_
- आकार: फक्त 27 ते 30 सें.मी., वजन फक्त 120 ते 150 ग्रॅम
- ओळख: नर पक्षी एकदम गडद राखाडी-काळा, पोटाखाली आणि शेपटीखाली केशरी-तांबूस रंग, पाय आणि चोचीजवळ केशरी रंग. मादी थोडी फिकट, पोटावर ठिपके असतात.
- खाद्य: हा पक्षी प्रामुख्याने कीटक खातो - वाळवी, टोळ, भुंगे, मुंग्या. म्हणूनच तो शेतीसाठी मित्र पक्षी मानला जातो.
- प्रवास: वर्षाला जवळपास 22,000 किमी. सैबेरिया -> भारत -> अरबी समुद्रावरून सलग 5 ते 6 दिवस, 3000 ते 6000 किमी न थांबता उड्डाण -> दक्षिण आफ्रिका. समुद्रावर तो कुठेच थांबत नाही.
- संरक्षण: IUCN च्या यादीत Least Concern, पण भारतात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार अनुसूची-1 मध्ये संरक्षित. याची शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे.

    फलटणमध्ये दिसणं का महत्त्वाचं?

    अमूर फाल्कन सहसा ईशान्य भारतातून जातो. तो पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः फलटणसारख्या दुष्काळी पट्ट्यात दिसणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. याची दोन कारणं असू शकतात - हवामान बदलामुळे स्थलांतर मार्गात बदल होत असावा, किंवा हा पक्षी मुख्य थव्यापासून भरकटून इकडे आला असावा.

    फलटण परिसरातील माळरान, तलाव आणि कीटकांची उपलब्धता त्याला थांबण्यासाठी पोषक ठरली असावी, असा अंदाज पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

    या नोंदीमुळे फलटण तालुका आता राज्याच्या पक्षी नकाशावर आला आहे. स्थानिक प्रशासन, वनविभाग आणि पक्षीप्रेमींनी या पक्ष्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

No comments